अकोला – वांरवार सांगून, समुपदेशन करुन, उपचार करुन सुद्धा अनेक जण दारु पिणे सोडत नाही. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीपासून दारुची दुकाने, बार रेस्टारंट बंद झाल्याने बेवड्यांना चांगलीच अद्दल घडली आहे. जे दारु पिल्याशिवाय एक दिवस सुद्धा राहु शकत नाही असे अनेक जण तालुका, गावांकडे धाव घेत दारुची शोधाशोध घेत आहे.
यासाठी ते जास्तीचे पैसे मोजून सुद्धा क्वॉटर घेण्यास तयार आहे. मात्र आता बहुतांश गावात अनोळखींना नो एन्ट्री झाल्याने बेवड्यांचे हातपाय थरथरायला लागली आहे. अकोला जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू झाल्यापासून दारुची सर्व दुकाने बंद करण्यात आली.
रेस्टारंट, धाबे बंद केल्यानंतर ही ग्रामीण भागात अनेकांना सहजपणे दारु मिळत होती. मात्र लोकांनी रस्त्यावर फिरणे, गर्दी कमी न केल्यांने राज्य शासनाकडून ३१ मार्च पर्यंत लॉकडाऊन जाहिर करुन संचारबंदी करण्यात आली. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचे लॉक डाऊन जाहिर केल्याने दररोज दारु पिणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली आहे.
चोरटी विक्री, स्टॉक संपला
सध्या शहरात काही ठिकाणी चढ्या दराने चोरट्या मार्गाने दारु विक्री झाली. आता स्टॉक संपल्याने अनेकांनी ग्रामीण भागात, तालुक्याच्या ठिकाणी धाव घेत दारु खरेदी केली. अजुन ही अनेक ठिकाणी दारुचा साठा असल्याने आपल्या ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून दारु खरेदी केली जात आहे. काही जण तर क्वॉटर कुठे मिळते असे विचारताना दिसत आहेत.