अकोला (प्रतिनिधी)- जगात सध्या सर्वत्र कोरोनाचा धसका बसलेला आहे;त्यात भारतात सुधा ३० पेक्षा जास्त संशयीत आढळले असून अशातच अकोल्यात ‘कोरोना’चा पहिला संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वार्डात रुग्णावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मुळ अकोल्यातील रहिवासी असलेली २४ वर्षीय तरुणी जर्मनीला नोकरीसाठी गेली होती. दोन दिवसांपूर्वी ती जर्मनीवरुन भारतात पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. यानंतर ती थेट अकोल्यात पोहोचली. घरी आल्यावर तरुणीला ताप येण्यास सुरुवात झाली. प्रकृती खालावत असल्याने आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नाही ना? असा संशय आल्याने शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तरुणीने थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वार्डात धाव घेतली. डॉक्टरांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्याने तरुणीवर उपचारास सुरुवात करण्यात आली. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून प्राथमिक उपचार सुरू असून नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदरी घ्यावी असे डॉक्टरांनी मत व्यक्त केले