अकोला, दि. १३(जिमाका)- शहरातील अशोक वाटीका ते रेल्वे स्टेशन या दरम्यान असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ ( जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६) या रस्त्यावर उड्डाण पूल उभारण्याचे काम सुरु आहे. या रस्त्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांचे देखभाल दुरुस्तीचे काम येत्या आठवड्याभरात करण्यात येईल, असे या प्रकल्प संचालक व्ही.पी. ब्राह्मणकर यांनी पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना लेखी कळविले आहे. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी या कामाचा आढावा घेतल्यानंतर ही उपाययोजना झाली आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार कल्याण विभागाचे राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी शहरातील वाहतुक समस्येचे निराकरण करण्यासाठी शहरांतर्गत उभारण्यात येत असलेल्या अशोक वाटीका ते रेल्वे स्टेशन उड्डाणपूल व संलग्न रस्त्यांचे संबंधित ठेकेदाराने देखभाल दुरुस्ती करावी. याठिकाणी ही कामे संथगतीने सुरु असून ती वेगात पूर्ण करावीत. नागरिकांना होणारे रहदारीचे अडथळे तात्काळ दूर करुन रस्ता सुरक्षित वाहतुकीस योग्य बनवावा असे निर्देश ना. कडू यांनी दिले होते. त्यानुसार, संबंधित ठेकेदार यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांना लेखी पत्राद्वारे या रस्त्याची देखभाल दुरुस्ती सोमवार दि.१० पासून एक आठवड्याच्या आत पूर्ण करण्यात येईल,असे कळविले आहे.