तेल्हारा (प्रतिनिधी)- तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील कारलावेस भागात राहणाऱ्या 47 वर्षीय शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आज पहाटे आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.
हिवरखेड येथील कारलावेस परिसरात राहणारे गणेश देविदास गोमासे वय 47 वर्ष यांच्याकडे जेमतेम 3 एक्कर शेती असून सततची नापिकी व कर्जाचा डोंगर या विवंचनेतून आज पहाटे 5 वाजेच्या दरम्यान आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविला. सदर मृतक शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज असून या मानसिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची बोलल्या जात आहे. त्यांच्यामागे पत्नी, आई वडील असा परिवार आहे. गोमासे यांच्या मृत्यूने हिवरखेड परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदर मृतदेह तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष लवंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. महादेव नवरे, पो. कॉ. विनोद गोलाईत हे करीत आहेत.