अकोला- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज ‘मातोश्री’ वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा अर्थात एनआरसीविरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे 26 डिसेंबरला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिलं होतं.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांना माहिती दिली. प्रकाश म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचा निरोप आल्याने भेटायला आलो. 26 तारखेला धरणे आंदोलन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी शांततेचं आवाहन केलं. आमची आंदोलने शांततेतच होतात असं सांगितलं”
भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेबाबत माझ्याकडे असलेली माहिती मुख्यमंत्र्यांनी मागितली आहे. पुढच्या बैठकीत मी त्यांना माझ्याकडे असलेली माहिती देणार आहे, असं आंबेडकर म्हणाले.
“नागरिकत्व कायदा केवळ मुस्लिमांनाच लागू होतो हा भाजप-संघाचा प्रचार खोटा आहे. या कायद्यामुळे 40 टक्के हिंदूही भरडले जाणार आहेत. शिवाय अन्य जातींनाही याचा फटका बसणार आहे, त्यामुळेच हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे”, असं प्रकाश यांनी सांगितलं.