अकोला: भरपूर पाणी पिण्याचे फायदे वैद्यकशास्त्र बरेच आधीपासून सांगत आले आहे. पाणी प्यायल्याने आरोग्य चांगले राहते, आजारपण दूर पळतात. इतरही अनेक व्याधींपासून दूर ठेवण्यात पाण्याची मोठी भूमिका आहे. ही सवय लहान वयातच लागली तर आरोग्याशी निगडित बऱ्याच समस्या निकाली निघू शकतात. नेमकी हीच बाब हेरून अकोला चे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत ‘वॉटर बेल’ चा उपक्रम सुरू केला आहे. अकोला शहरातील शिवनी येथीaल जिल्हा परिषदेच्या शाळेपासून याची सुरुवात करण्यात आली आहे.
पाणी शरीराकरिता उपयुक्त असूनही विद्यार्थी अनेकदा पाणी पिण्याचे विसरून जातात. अनेकदा टाळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यांना या आजारापासून वाचविण्यासाठी शाळेत वॉटर बेल देण्याची संकल्पना पुढे आली. अकोल्यातील शिवनीच्या शाळेत मंगळवारपासून याची सुरुवात करण्यात आली. शाळा सुरू झाल्यावर सकाळी ११.३० वाजता पहिली, २.४५ वाजता दुसरी तर ५.१५ वाजता तिसरी ‘वॉटर बेल’ वाजणार आहे. ही बेल वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या बाटलीतील पाणी पिण्याच्या सूचना देण्यात येतात. या अनोख्या उपक्रमाचे शहरातील बऱ्याच डॉक्टरांसह पालक वर्गाकडूनसुद्धा स्वागत होत आहे.
सर्वच शाळांमध्ये राबविणार उपक्रम
विद्यार्थ्यांचे पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आम्ही ‘वॉटर बेल’ उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच तो सर्व शाळांमधून राबविला जाईल. शाळांनीसुद्धा स्वयंस्फूर्तीने हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यात मदत करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकुंद यांनी केले आहे.
विद्यार्थी दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ शाळेत असल्याने सहाजिकच पाणी पिण्याकडे त्याचे दुर्लक्ष होते. ‘डीहायड्रेशन’ होऊन आजारी पडतात. त्यामुळे त्यांना ठराविक वेळेला पाणी प्यायला लावून आपण विविध आजारांपासून दूर ठेवू शकतो. सगळ्या शाळांनी हा उपक्रम राबवावा.
-डॉ. नरेश बजाज, बालरोगतज्ज्ञ
सोशल मीडियामुळे कळली ‘वॉटर बेल’
केरळमधील एका शाळेच्या ‘वॉटर बेल’ उपक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ही नेमकी काय संकल्पना आहे, याची चर्चा होऊ लागली. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हे आवश्यक असल्याने अकोल्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रात पहिल्यांदाच अकोला शहरात हा उपक्रम सुरू केला आहे.