अकोला(प्रतिनिधी)- ६२ वर्षीय वृध्द आदिवासी शेतकऱ्याने नापिकीला, कर्जबाजीरीपणाला व पावसाने खराब झालेल्या पिकाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळडोळी येथे घडली.
अकोला जिल्ह्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळडोळी येतील शेतकरी तुळशीराम नामदेव शिंदे वय ६२ वर्ष हे आपल्या राहत्या घरून बुधवारी कोणालाही न सांगता निघून गेले होते. शेतात ४ एक्कर सोयाबीनचे पिक उभे होते परंतु सततच्या पावसामुळे सोयाबीन सोंगता न आल्याने त्यामुळे पेरणीचा खर्च सुध्दा निघाला नाही परिणामी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. त्यात बँकेच्या कर्ज या विवंचनेतून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे मंगळवारी उघड झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार बुधवार १३ नोव्हेंबर रोजी तुळशीराम शिंदे कुणालाही न सांगता घरून निघून गेले. गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली. आज १९ नोव्हेंबर रोजी वनपरिक्षेत्र आलेगांव अंतर्गत येत असलेल्या नवेगाव वनविभागाच्या जंगलामध्ये निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे लक्षात आले. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून त्यांनी पंचनामा करुन सात दिवसापासून झाडाला लटकलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. तुळशीराम यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे.