नाशिक (प्रतिनिधी)- राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तीन कंपन्यांतील सभासद असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी श्री. विकास आढे यांची बुधवारी (2 ऑक्टोबर) बिनविरोध निवड करण्यात आली. विकास आढे हे महावितरणमध्ये नाशिक परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
नाशिक येथे आयोजित अधिकारी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये नवीन अध्यक्ष म्हणून श्री. आढे यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष सतीश तळणीकर, सरचिटणीस डी. आर. शिंदे, संघटन सचिव प्रवीण बागुल, माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक गुलाबराव मानेकर यांचेसह महावितरण, महापारेषण व महानिर्मिती यामधील राज्यातील सर्व परीमंडळातील पदाधिकारी व पतसंस्थेचे संचालक उपस्थित होते.
ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांमधील वर्ग १ आणि २ चे अतांत्रिक अधिकारी या संघटनेचे सभासद आहेत. विकास आढे हे मागील ५ वर्षांपासून अधिकारी संघटनेचे केंद्रीय कोषाध्यक्ष काम पाहत होते. तसेच अधिकारी संघटनेच्या पतसंस्थेचे संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. संघटनेचे नवीन अध्यक्ष म्हणून विकास आढे यांच्या झालेल्या निवडीचे राज्यभरातून स्वागत होत आहे.