विदर्भातून त्यातही पूर्व विदर्भातून राज्याचा विद्यमान मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेता आपले भविष्य अजमावणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (दक्षिण पश्चिम नागपूर) आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (ब्रह्मपुरी-चंद्रपूर) या दोन प्रमुख दिग्गजांशिवाय चंद्रशेखर बावनकुळे (कामठी-नागपूर), सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर-चंद्रपूर), डॉ. अनिल बोंडे (मोर्शी-अमरावती), संजय कुटे (बुलडाणा), संजय राठोड (दिग्रस-यवतमाळ), मदन येरावार (यवतमाळ) हे राज्य मंत्रिमंडळातील विद्यमान मंत्री, तर राजकुमार बडोले (भाजप), मनोहर नाईक, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, रमेश बंग (रॉ. काँ.), नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, राजेंद्र मुळक हे सर्व माजी मंत्रीही या निवडणुकीत आपले नशीब अजमावू शकतील, अशी चर्चा आहे.
2014 मध्ये विदर्भात भाजपचाच जलवा होता. त्यावेळी भाजपला विदर्भातील 62 पैकी 44 जागा मिळाल्या होत्या. 10 जागा काँग्रेसला, चार जागा शिवसेनेला, 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, 1 जागा भारिप बहुजन महासंघ आणि दोन जागा अपक्षांना मिळाल्या होत्या. भाजप आणि शिवसेना यांची युती होणार, असे आज तरी बोलले जाते. युती झाली तरी भाजपकडे असलेल्या जागा सेनेला देणार का, हाही कळीचा मुद्दा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष विदर्भातही सैरभैर आहेत.
विदर्भात सध्या केंद्रीय पातळीवरील दबंग व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले गेलेले नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही सक्रिय आहेत. 1960 मध्ये महाराष्ट्राला जोडला गेल्यावर काँग्रेस शासनाने विदर्भाला कायम दुर्लक्षित ठेवले होते.
विदर्भातील प्रमुख लढती लक्षात घेता दक्षिण पश्चिम नागपूरमधील लढत आणि दुसरी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदारसंघाची आहे. गत पाच वर्षांतील फडणवीस यांची कामगिरी बघता त्यांच्याविरोधात काँग्रेस जो कोणी उमेदवार दईल तो ‘बळीचा बकरा’ बनणाराच असेल, याबाबत कोणाचेही दुमत नसावे. ब्रह्मपुरी मतदारसंघ हादेखील विजय वडेट्टीवारांची होमपिच म्हणूनच ओळखला जातो. अर्थात, यावेळी भाजप त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार देऊन त्यांना मतदारसंघात बांधून ठेवण्याच्या विचारात आहे.
राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही आपल्या बल्लारपूर मतदारसंघावर चांगलीच पकड आहे. चंद्रपूर जिल्हा हा जुन्या जनसंघाच्या काळापासून भाजपचाच बालेकिल्ला आहे. त्यामुळे ते विजयी होणार हे निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 2014 मध्ये फक्त यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद मतदारसंघाची एकच जागा विदर्भात मिळवता आली होती. यावेळी इथले परंपरागत आमदार मनोहर नाईक निवडणूक लढवणार नाहीत, अशी चर्चा आहे. मात्र, याचवेळी त्यांची मुले आणि पुतणे यांच्यात आमदार कोणी व्हायचे, यावरून रस्सीखेच चालू आहे. रा.काँ.चे माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, धर्मरावबाबा आत्राम हेदेखील मैदानात उतरणार हे निश्चित आहे. सध्या काँग्रेस, रा.काँ. यांच्यात युती आहे.
नितीन राऊत आणि सतीश चतुर्वेदी हे दोन काँग्रेसी दिग्गजही दंड थोपटणार, हे निश्चित आहे. चतुर्वेदींनी नुकतेच आपला मुलगा दुष्यंत याला शिवसेनेत डेरेदाखल केले आहे. त्यामुळे आता बाप-लेकापैकी कोण मैदानात येणार की, दोघेही परस्परांविरुद्ध लढणार, हे बघायचे आहे.
अकोला जिल्हा सोडला तर प्रकाश आंबेडकरांचा एकही आमदार निवडून येणार नाही- रामदास आठवले
गत काही वर्षांमध्ये विदर्भात बसपा हा मते खाणारा पक्ष ठरला होता. यावेळीदेखील बसपा मैदानात उतरणार आहे. मात्र, आजवर एकदाही बसपाला विदर्भातून उमेदवार निवडून आणता आला नसल्याने यावेळी ते भाजपला मते खाऊन मदत करतात की काँग्रेसला हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
प्रकाश आंबेडकरांची नव्याने तयार झालेली वंचित बहुजन आघाडीदेखील विदर्भात जास्तीत जास्त जागांवर उमेदवार उभे करणार आहे. बसपाच्या उमेदवारांचा फटका कोणाला बसतो, यावर प्रमुख पक्षांचे यशापयश अवलंबून आहे. 2014 पर्यंत आंबेडकर भारिप बहुजन महासंघातर्फे निवडणूक लढवत होते. अकोला, बुलडाणा, वाशिम येथे त्यांचे अस्तित्व आहे. 2014 मध्ये बाळापूरमधून त्यांचा 1 आमदार निवडून आला होता.
अपक्ष बच्चू कडू आणि राणा जगजितसिंह हे दोघे अमरावती जिल्ह्यात जोर मारतात आणि निवडूनही येतात. नुकतीच राणांची पत्नी नवनीत कौर लोकसभेत निवडून गेली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्य अमरावती जिल्ह्यातील निकालांंवर परिणाम करू शकते. यावेळी विदर्भवाद्यांच्या विविध संघटनाही मैदानात उतरणार आहेत. त्यात वामन चटप आणि राजकुमार तिरपुडे हे दोन सक्षम उमेदवार ठरावेत, बाकी सर्व उमेदवार हे कोणाची तरी मते खाणार हे पक्के. भाजपच्या जागा सेनेला देण्याची वेळ आली, तर बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर बसपा, विदर्भवादी आणि वंचित आघाडी हे तिन्ही फॅक्टर्स किती मते खातात त्यावरच इतरांचे भवितव्य अवलंबून आहे. एकूणच आज तरी विदर्भात युतीला आणि त्यातही भाजपला पोषक वातावरण असल्याचे चित्र आहे. जशीजशी निवडणूक जवळ येईल, तसतसे चित्र अधिकाधिक स्पष्ट होणार आहे.