1 मे 1960 रोजी मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पण, त्याआधी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याने सारे राज्य ढवळून निघाले. स्वातंत्र्य लढ्यानंतर एवढे मोठे आंदोलन प्रथमच झाले.
खरे म्हणजे 1937-38 मध्येच काँग्रेस पक्षाने भाषावार प्रांतरचनेचे आश्वासन दिले होते. पण, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसने टोपी फिरवली. 1948 मध्ये दार कमिशनचा अहवाल आला. त्यात भाषावार प्रांत रचनेला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या होत्या. एवढेच नव्हे, तर या अहवालात मराठी लोकांवर अपमानास्पद टिप्पणी होती. 1953 मध्ये फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने काय निर्णय दिला? मुंबईसह द्वैभाषिक राज्य मराठी जनतेच्या पदरात आले. मराठी भाषिकांवर कडाच कोसळला. मराठी जनता पेटून उठली. मराठी भाषिकांची अस्मिता पणाला लागली. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांचे द्वैभाषिक होते. त्यातच मुंबई केंद्रशासित करण्याचाही सूर निघाला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अभूतपूर्व आंदोलन उभे राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सेनापती बापट, एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे, श्रीपाद डांगे, प्रबोधनकार ठाकरे, उद्धव पाटील आदी नेत्यांनी या लढ्याचे नेतृत्व केले. शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे, गव्हाणकर आदींनी आपल्या शाहिरीतून रान उठवले. काँग्रेसविरोधात सारे पक्ष एकवटले. मुंबईत 106 हुतात्मे झाले. द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी सूत्रे घेतली. त्यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. पण 1957 च्या विधानसभा निवडणुकीत लोकक्षोभ प्रकट झाला. विधानसभेच्या 264 जागा होत्या. त्यापैकी 135 काँग्रेसला मिळाल्या. 129 समितीने जिंकल्या. काँग्रेसला काठावरचे बहुमत मिळाले. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात काँग्रेसचा धुव्वा उडाला.
जनतेतील प्रक्षोभ लक्षात घेऊन अखेर काँग्रेसला या प्रश्नावर विचार करण्यासाठी समिती नेमावी लागली. त्या समितीने महाराष्ट्र, गुजरात अशी दोन राज्ये करण्याची शिफारस केली. तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा श्रीमती इंदिरा गांधी यांनीही तसा कौल दिला. पं. नेहरू हे महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यास अनुकूल नव्हते. प्रतापगडावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. तेव्हा समितीच्या झेंड्याखाली हजारोंनी शिस्तबद्ध निदर्शने केली. अखेर मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पण, या धामधुमीत बेळगाव, कारवार आदी मराठी भाषिक भाग कर्नाटकातच (तेव्हाचे म्हैसूर) अडकला.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाण हेच पहिले मुख्यमंत्री झाले. राज्यात विधानसभा मतदारसंघाची रचना करण्यात आली. ही पहिली विधानसभा! दोन वर्षांच्या कालावधीत यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारने पंचायत राज्य स्थापनेसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
Comments 2