हिवरखेड (धीरज बजाज)- मुख्यमंत्री महोदय उद्या आपण अकोला जिल्ह्यात येणार आहात आचारसंहिता लागण्यापूर्वी आपण अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या हिवरखेड नगरपंचायत चा मुद्दा मार्गी लावाल ना ? अशी रास्त मागणी विकास वंचित हिवरखेडकर आपल्याकडून व्यक्त करीत आहेत.
हिवरखेड विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून सध्यास्थितीत वास्तविक लोकसंख्या जवळपास 40 हजारांच्या जवळपास आहे. अनेक राजकीय व्यक्तींनी हिवरखेड ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत मध्ये करणार असे लॉलीपॉप जनतेला देऊन निवडून येण्याचा आपला स्वार्थ साधला. परंतु प्रदीर्घ कालावधीपासून जनतेची नगरपंचायतीची असलेली मागणी पूर्ण करण्यात आजपर्यंत कोणीच रस दाखवला नाही. हिवरखेड गावाचा विस्तार मोठा असून ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या तोकड्या निधीमधून हिवरखेडचा सर्वांगीण विकास कदापि शक्य नाही हे सत्य उघड आहे. त्यामुळे हिवरखेड वासियांनी अनेक ग्रामसभांमध्ये एकमताने अनेकदा नगरपंचायत करण्याचे ठराव मंजूर करून घेतले.
सर्वसमावेशक हिवरखेड विकास मंच आणि अनेक सामाजिक कार्यकऱ्यांकडून सुद्धा अनेकदा पाठपुरावा केल्या गेला. हि मागणी सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांच्यामार्फत प्रधानमंत्र्यांपर्यंत केल्या गेल्यावर प्रधानमंत्री कार्यालयांद्वारे महाराष्ट्र शासनाला योग्य पावले उचलण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. परंतु नंतर महाराष्ट्र शासनाद्वारे कागदी घोडे नाचविण्या व्यतिरिक्त त्याच्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने जनतेला फक्त आश्वासनांचे चॉकलेटच लोकप्रतिनिधींमार्फत देण्यात आल्याचे सिद्ध झाले.
विशेष म्हणजे यावेळी जनतेने हिवरखेड नगरपंचायत करणे हे माझे स्वप्न असून ते मी पूर्ण करणारच, असे सांगणारे अकोट मतदार संघाचे विकास महर्षी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी मात्र पाच वर्ष नगरपंचायतच्या मुद्द्यावर जनतेच्या भावनांशी खेळ केला असल्याचे निदर्शनास येत आहे. एव्हडेच नव्हे तर चक्क जिल्ह्याचे पालकमंत्री रणजीत पाटील हे स्वतः नगर विकास राज्यमंत्री असून सुद्धा अजून पर्यंत हिवरखेड नगरपंचायत झाली नाही याला दिव्याखाली अंधार म्हणावे काय ? असा प्रश्न सुद्धा सामान्य जनतेच्या मनात घुसमटत आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्वरित हिवरखेड नगर पंचायतची घोषणा करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
अधिक वाचा : जम्मू-काश्मीर: जाणून घ्या कलम ‘३५ अ’ आणि कलम ‘३७०’
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola