अकोला (प्रतिनिधी) : गटशेती, समुह शेती ते शेतकऱ्यांची शेतीमाल उत्पादन कंपनी या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्र यावे. केवळ उत्पादक न राहता व्यापारी होऊन एकमेकांच्या मदतीने आपणच आपला उद्धार करावा, असे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे प्रति कुलपती ना. डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे केले. या कार्यशाळेस अमरावती विभागातील 1500 हून अधिक शेतकरी उपस्थित होते.
येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांच्या वतीने अमरावती विभागातील शेतकरी उत्पादक कंपन्याची एक दिवसीय कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे प्रति कुलपती ना.डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथील दीक्षांत सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेसाठी कुलगुरू डॉ. विलास भाले, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, अपर जिल्हाधिकारी नरेश लोणकर, उद्योजिका कु. मनाली बोंडे, विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य गणेश कंडारकर, विनायक सरनाईक, मोरेश्वर वानखेडे, तसेच विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, कृषि सहसंचालक सुभाष नागरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना.डॉ. बोंडे म्हणाले की, राज्यशासनाने विदर्भातील शेतकऱ्याच्या समस्या जाणून आधी अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे काम सुरु केले. शासन आपल्याला विविध योजनांच्या माध्यमातून मदत करत असतांना त्या योजनांचा जागरुकपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. याच योजनांमधून आपण आपली शेतकरी कंपनी स्थापन करुन एकमेकांच्या सहकार्याने प्रगती साधू.
कंपनीची स्थापना केल्यानंतर निर्यातीच्या गुणवत्तेचा माल उत्पादित करण्यास प्राध्यान्य द्यावे. स्थानिक बाजारापेठेतही या दर्जाचा माल घेणारे ग्राहक असतात. एकदा आपण उद्योग करत असतांना पूर्णपणे व्यापारी पद्धतीने तो करावा. एक कुशल व्यावसायिक आपल्याला होता आलं पाहिजे. शासनाच्या विविध योजनांचा जागरुकपणे अभ्यास करा. सतत जागरुक राहून होणाऱ्या बदलांचा अभ्यास करा, असा हितोपदेशही ना. डॉ. बोंडे यांनी यावेळी दिला.
यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, विदर्भाचा शेतकऱ्याने स्वतःच्या क्षमता व बलस्थाने ओळखावी, तुजे आहे तुजपाशी या प्रमाणे स्वतःच्या क्षमता ओळखून स्वतःचा विकास करावा, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरावती विभागाचे कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांनी केले. या कार्यशाळेत शेतकरी उत्पादक कंपनीचे आर्थिक नियोजन पद्धती या विषयावर कु. मनाली अनिल बोंडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच निर्यातक्षम उत्पादने संधी व आव्हाने या विषयावर राज्यस्तरीय तांत्रिक निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच डॉ. डी. एम. पंचभाई, डॉ.एस.एम. घावडे, डॉ. पैठणकर, डॉ. जी.जी. जाधव आदी तज्ज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रदीप बोरकर यांनी केले तर संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेला अमरावती विभागातून सुमारे १५०० शेतकरी सहभागी झाले होते.
अधिक वाचा : हिवरखेड येथे आ. प्रकाश भारसाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola