अकोला : कृषी सहाय्यक, कृषी मित्र व विद्यापिठाचे विदयार्थी यांनी विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी एकत्र येवून समन्वयाने काम करणे गरजेचे असुन शेतकऱ्यांशी संवाद वाढवून बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शेतक-यासाठी काम करणारी आर्मी तयार करावी असे प्रतिपादन कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विदयापीठ येथे कृषि मित्र, कृषि सहाय्यक व कृषि विदयार्थी यांचा सहभाग असलेल्या खरीप हंगाम समन्वय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे, डॉ. पंजाबराव देशमुख विदयापिठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, आमदार रणधीर सावरकर, कार्यकारी परिषदेचे सदस्य जैनुद्दीन जव्हेरी, गणेश कंडारकर, स्नेहा हरडे, विनायक सरनाईक, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषि मंत्री पुढे म्हणाले, कृषी खाते शेतक-यांसाठी काम करते व कृषि विद्यापीठे शेतक-यासाठी संशोधन करतात. कृषि ज्ञान विद्यापिठाच्या चार भिंतीच्या आत बंदिस्त राहू नये विद्यापिठातील शास्त्रज्ञांनी सतत शेतक-यांच्या संपर्कात राहावे व शास्त्रज्ञांनी आपले ज्ञान कृषि विभागाशी समन्वय साधुन शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहचवावे असे निर्देश त्यांनी दिले. शेतक-यांना आर्थिक विपषणामुळे अपमानातुन जावे लागते. कृषि मित्र व कृषि सहाय्यकांनी शेतक-यांशी सातत्यपुर्ण संपर्क साधल्याने शेतक-यांमध्ये आत्मबळ निर्माण होवून आत्महत्या सारख्या वाईट विचारापासुन परावृत्त होण्यास मदत होते.
कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले, शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. कृषी सहाय्यक यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बसून कामकाज केले पाहिजे. यासंदर्भात त्यांच्या कामाचे वेळापत्रक तयार करुन याबाबत कार्यवाही त्वरित करण्यात यावी. अधिकाऱ्यांनी शेतावर जावे, शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जागेवरच सोडवाव्यात. शेतकऱ्यांशी संवाद वाढवावा, असे निर्देशही डॉ. बोंडे यांनी दिलेत. कृषि सहाय्यकांना हक्काची जागा मिळावी यासाठी ग्रामपंचायत कार्यालय कृषि सहाय्यकाचे कार्यालय तयार करण्यात येणार आहे. तसेच लवकरच प्रत्येक तालुक्यामध्ये कृषि भवन व प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वंतत्र कृषि सहाय्यकाचे कार्यालय राहील असेही त्यांनी सांगितले. कृषि सहाय्यकांनी गावात आल्यावर व परतांना आपल्या ॲडरॉईट मोबाईलव्दारे आपला तालुका कृषि अधिका-यांशी व जिल्हा कृषि अधिका-यांशी संपर्क साधावा. कृषि सहाय्यकांनी आपले काम संवेदनशील होवून करावे असेही त्यांनी सांगितले.
विद्यापिठाच्या शिक्षणाची वृध्दी व्हावी यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 600 कोटी रूपयाचे प्रावधान करणात आलेले आहे. यासाठी शेतक-यांच्या हिताचे प्रस्ताव विद्यापीठाने शासनाकडे त्वरीत सादर करावे. मुल्य वर्धन संशोधनाबरोबर विद्यापीठाने प्रोफेशनल झाले पाहीजे यासाठी संशोधनाची नोंदणी करून पेंटेन्ट मिळवावे व विद्यापिठानी कमर्शियल बनून शेतक-यांना उत्पन्न् वाढीसाठी याचा फायदा दयावा असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यासाठी सिंचनाची सुविधा, पूरक उद्योग, कृषी पंप, कृषी यांत्रिकीकरण आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच पारंपारिक पिकासोबच फळपिक घेण्याकडेही शेतकऱ्यांना वळवावे. त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. यात सुरुवातीला शेतीमधील उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत देण्यात आली आहे. परंतू त्यानंतर बोंडअळीचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात आले. गेल्यावर्षी बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला नाही. यावर्षी प्रादूर्भाव होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान योजना ) योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांना थेट मदत व्हावी यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशभरात राबविण्यात येत असून योजने अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये प्रमाणे तीन टप्प्यात जमा करण्यात येते. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषी विभागाने व महसूल प्रशासनाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची अंमलबजावणी अतिशय प्रभावीपणे करुन सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ द्यावा. यापासून कोणीही वंचित राहू नये. बोंडअळीसंदर्भात व विविध नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारणही त्वरित करण्यात यावे. संबंधितांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप शेतकऱ्यांना त्वरित उपलब्ध करुन देण्यात यावेत. खरीप पीककर्ज वाटपाचे उदिष्ट पूर्ण करावे. बँकांनी यासंदर्भात मागे राहू नये. उदिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकेवर कारवाई करण्यात येईल. कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी.पीककर्जासंदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी वेळीच प्रशासनाने मांडाव्यात. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील सर्व पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले पाहिजे. पीकविम्यासंदर्भात कृषी आणि सहकार विभागाने समन्वयाने काम करावे. तालुका स्तरावर यासाठी दक्षता समिती स्थापन करावी. तालुका आणि जिल्हा स्तरावर यासाठी मदत केंद्र उभारावे. विमा कंपन्यानीअधिक जबाबदारीने काम करावे. असे विविध निर्देशही कृषी मंत्री डॉ. बोंडे यांनी दिले.
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे म्हणाले, सर्व संस्कृतीमध्ये कृषि संस्कृती व सर्व शास्त्रामध्ये कृषि शास्त्र हे आद्यशास्त्र आहे. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञान युगात तंत्रज्ञानाची जोड देवून शेतीमध्ये प्रगती करावी यासाठी विदयापीठाने व कृषि विभागाने समन्वयाने काम करून शेतक-यांच्या अडिअडचणी सोडवाव्यात. विदयापीठाने व कृषि विभागाने समन्वय साधुन मागील वर्षी केलेले कपाशीच्या पीकावरील गुलीबी बोंड अळीचे निर्मुलन ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
विदयापीठाने व कृषि विभागाने शेतक-यांशी समन्वय ठेवला तर शेतक-यांची नक्कीच प्रगती होवू शकते असे विचार आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले. विदयापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी विदयापीठाच्या प्रगतीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.
यावेळी संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. डि.एम. मानकर व किटकशास्त्र व्यवस्थापन संचालक डॉ. उंदिरवाडे यांनी आपल्या विभागाच्या संशोधनाची माहिती दिली. या वेळी विद्यापीठाला 50 वर्ष पुर्ण झाले त्या निमित्य तयार करण्यात आलेल्या सुवर्ण महोत्सवी स्मृती चिन्हाचे तसेच विविध माहिती पुस्तीकाचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रांरभी कृषि मंत्री डॉ. अनिल बोंडे, पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी कृषि विद्यापीठातर्फे आयोजीत प्रदर्शनीला भेट दिली. या प्रदर्शनीमध्ये पिकेव्ही हायब्रीड 2 बिजी कापुस वाण, पिकेव्ही सोयाबीन, पीकेव्ही गहु तसेच किटकशास्त्र विभाग, सेंद्रीय शेती व संशोधन केंद्र, पिकेव्ही पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभाग, कृषि शक्ती व अवजारे विभाग यामध्ये लसुन टोचन यंत्र, हळद काढणी यंत्र, सायकल डवरा, डवरणी यंत्र, आंतरमशागत यंत्र, स्क्रु पॉलीशर यंत्र, मीनी दाल मिल क्लिनर ग्रेडर, तसेच उद्यान विदया शाखाचे स्टॉल लावण्यात आले होते.
या कार्यशाळेला जिल्हयातील कृषि सहाय्यक, कृषि मित्र, विदयापीठाचे विदयार्थी, शास्त्रज्ञ, कृषि विभागाचे कर्मचारी/अधिकारी उपस्थिती होती.
अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृहाचे कृषी मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विदयापीठ परिसरात अल्पसंख्याक मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख विदयापिठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, कार्यकारी परिषदेचे सदस्य जैनुद्दीन जव्हेरी, गणेश कंडारकर, स्नेहा हरडे, विनायक सरनाईक, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांची उपस्थिती होती.
कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सदर वसतीगृह वातानुकूलीत करावे तसेच येथील सर्व यंत्रणा सौर उर्जेवर असावी तसेच येथे सुसज्ज असे जीम व लायब्ररी असावी असे निर्देश संबंधीतांना दिलेत.
यावेळी वसतीगृहाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
अधिक वाचा : अकोला : कस्टम ड्युटी वाढीमुळे ग्राहकांच्या संख्येत होणार घट, सराफा व्यावसायिकांना भीती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola