मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे वलय, शिवसेना-भाजपशी युती करूनही रिपाइंला लाेकसभेची एकही जागा न सुटणे यामुळे रिपाइं कार्यकर्ते बिथरले आहेत. त्यामुळेच आता सोलापूर, अहमदनगर, शिर्डी, दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघांत पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांचा निर्णय झुगारून भाजप -शिवसेनेच्या विरोधात मतदान करण्याच्या निर्णयाप्रत रिपाइं कार्यकर्ते आले आहेत. शिर्डी मतदारसंघात यापूर्वी आठवलेंना पराभूत करणाऱ्या विखे पाटलांना नगर- शिर्डीत इंगा दाखवूच, असा निर्धारही या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
सांताक्रुझमध्ये गुरुवारी रिपाइंच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत आठवले यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तसेच राज्यातील आंबेडकरी समाजाचा कानोसाही व्यक्त केला. पक्षाचे प्रदेश सचिव राजा सरवदे यांनी सोलापुरातील वास्तव मांडले. प्रदेश सचिव विजय वाकचौरे यांनी शिर्डी, अहमदनगरमधील बाब मांडली, तर गौतम सोनवणे यांनी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांना समाजातून चांगला पाठिंबा मिळत आहे. येथून बसप उमेदवाराने माघार घेतली आहे. येथे भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांना आंबेडकरी समाजाकडून मतदान होणे मुश्कील आहे, याकडे रिपाइं कार्यकर्त्यांनी आठवलेंचे लक्ष वेधले.
२००९ च्या निवडणुकीचा राग
२००९ मध्ये शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी रामदास आठवले यांना पराभूत करण्यासाठी जातीय प्रचार केला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी रिपाइं कार्यकर्ते अहमदनगरमध्ये विखे पाटील यांच्या मुलाच्या (डाॅ. सुजय) विरोधात काम करणार आहेत. रामदास आठवले यांना दक्षिण मध्य मुंबई किंवा ईशान्य मुंबई मतदारसंघ हवा होता. तो न सोडल्याने या दोन्ही मतदारसंघांत रिपाइं कार्यकर्ते शिवसेना-भाजपच्या विरोधात काम करण्याची शक्यता आहे.
काय म्हणतात आठवलेंचे कार्यकर्ते
१ साहेब, गुलाल पाहिजे की नीळ… मेणबत्ती पाहिजे की अगरबत्ती.. असा ज्यांनी आपल्याविरोधात जातीय प्रचार केला, त्यांना म्हणजे विखे पाटलांना मतदान करा, असे कोणत्या तोंडाने सांगायचे, असा प्रश्न अहमदनगरच्या कार्यकर्त्यांनी अाठवलेंना केला.
२ ‘सोलापुरात साक्षात बाबासाहेबांचा नातू उभा आहे. त्यांना सोडून भाजपच्या हिंदू साधूला मतदान करा, असे बौद्धांना कोणत्या तोंडाने सांगायचे,’ असा सवाल सोलापूरच्या नेत्यांनी केला.
३ दक्षिण मध्य मुंबईची जागा शिवसेनेने अापल्याला सोडली नाही. शिवसेनेच्या एकाही पोस्टरवर तुमचा फोटो नाही. मग धारावीत शिवसेनेचा प्रचार आपल्या कार्यकर्त्यांनी काेणत्या तोंडाने करायचा, असा सवाल मुंबईच्या नेत्यांनी केला.
आठवलेंनी काढली समजूत, कारवाईचाही इशारा
कार्यकर्त्यांच्या मनातील ही खदखद ऐकल्यावर रामदास आठवले यांनी सर्वांची समजूत घातली. ‘पक्षविरोधी काम करू नका. तसे कोणी केले तर पक्षातून निलंबित केले जाईल,’ असा इशाराही आठवले यांनी दिला, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी दिली.
अधिक वाचा : हिवरखेड जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय येथे चोरट्यांचा संगणकावर डल्ला
Comments 2