अकोला (प्रतिनिधी) : असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या व ज्यांचे मासिक उत्पन्न रु. 15 हजार पेक्षा कमी आहे, तसेच जे कामगार हे कर्मचारी विमा निगम, भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचे सभासद नाहीत अशा असंघटीत कामगारांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ जास्तीतजास्त कामगारांनी घ्यावा, यासाठी नागरी सुविधा केंद्रात तातडीने नाव नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
नियोजन सभागृहात आज जिल्हास्तरावर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा शुभारंभ पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय निधी अकोला क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक भविष्य निधी आयुक्त सुशांत पाटील यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद येथे आज प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा राष्ट्रीयस्तरावर शुभारंभ करण्यात आला. त्याचे थेट प्रक्षेपण यावेळी नियोजन सभागृहात दाखवण्यात आले.
पालकमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेतंर्गत वयाचे साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मासिक वेतन रुपये 3 हजार एवढे मानधन दिले जाणार आहे. लाभार्थी कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या वैवाहिक जोडीदारास योजना सुरु ठेवता येणार आहे. लाभार्थीस सदर योजनेतून बाहेर पडावयाचे झाल्यास जमा केलेल्या अंशदानासह व्याजाची रक्कम परत मिळणार आहे. 18 ते 40 वयोगटातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतील. योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र संघटीत कामगारास आधारकार्ड, बँक पासबुक व मोबाईल क्रमांकासह नजीकच्या नागरी सुविधा केंद्रास (Common Service Centers) भेट देऊन स्वयंघोषणापत्राचे आधारे योजनेमध्ये सहभागी होता येईल. विशेष म्हणजे लाभार्थ्यास नागरी सुविधा केंद्रात विनामुल्य फॉर्म भरता येईल. जर पैशाची मागणी झाल्यास याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक कामगार आयुक्त, अकोला आणि सहायक आयुक्त, कर्मचारी भविष्य निधी कार्यालय निधी अकोला क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे करावी.
प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. फेरीवाले, मध्याह्र भोजन कामगार, डोक्यावरून वजन उचलणारे कामगार, वीटभट्टी कामगार, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर, कृषी क्षेत्रातील मजूर, विडी-कामगार, हातमाग कामगार, कातडे व्यवसायातील कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अतिशय उपयोगी आहे. कामगारांनी या योजनेचा जरुर लाभ घ्यावा. या कार्यक्रमात प्रातानिधीक स्वरुपात काही व्यक्तींना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची माहिती पुढील प्रमाणे आहे.
ज्यांचे मासिक उत्पन्न रु. 15,000/- अथवा त्यापेक्षा कमी आहे असे 18 ते 40 वयोगटातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात जसे की फेरीवाले, मध्याह्र भोजन कामगार, डोक्यावरून वजन उचलणारे कामगार, वीटभट्टी कामगार, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर, कृषी क्षेत्रातील मजूर, विडी-कामगार, हातमाग कामगार, कातडे व्यवसायातील कामगार इत्यादि आयकर दाते नसलेले व एनपीएस (नवी पेंशन योजना), इएसआयसी(कर्मचारी राज्य विमा निगम) अथवा ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निधि संघटक) यापैकी कोणत्याही योजनेचे सदस्य नसलेले या योजनेस पात्र आहेत.
पीएम-एसवायएमची प्रमुख वैशिष्टये पुढीलप्रमाणे –
किमान निश्चित पेंशन/निवृत्ती वेतन- पीएम-एसवायएम अंतर्गत प्रत्येक सहभागी व्यक्तीस वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर रू.3000/- किमान निश्चित पेंशन मिळेल.
कुटुंब निवृत्तीवेतन/परिवार पेंशन- जर पेंशन प्राप्त होत असताना पेंशन धारकाचा मृत्यु झाला तर धारकाच्या पत्नीस/पतीस धारकास मिळत असलेल्या पेंशनच्या 50 प्रतिशत रक्कम पेंशन म्हणून मिळेल. परिवार पेंशन केवळ जोड़ीदाराच्या बाबतीत लागू आहे.
जर सहभागी व्यक्तीने नियमित अंशदान दिले आहे व काही कारणाने वयाची 60 वर्षे पूर्ण करण्याआधी सहभागी व्यक्तीचा मृत्यु झाला तर सहभागी व्यक्तीचा जोड़ीदार योजनेत सहभागी होऊन नियमित अंशदान करून योजना चालू ठेवू शकतो अथवा योजनेतून बाहेर पड़ण्याच्या व रक्कम परताव्याच्या प्रावधानानुसार योजनेतून बाहेर पड़ू शकतो.
केंद्र शासनाकड़ून बरोबरीचे अंशदान- पीएम-एसवायएम, 50:50 प्रमाणाच्या आधारावर एक स्वैच्छिक तथा अंशदायी पेंशन योजना आहे ज्यामध्ये वयानुसार ठराविक अंशदान लाभार्थ्याद्वारा केले जाईल आणि तक्त्यानुसार बरोबर तेवढेच अंशदान केंद्र शासनाद्वारा केले जाईल. उदाहरणार्थ, जर व्यक्तीचे वय 29 वर्ष आहे तर त्यास 60 वर्षे वयापर्यंत दर महिन्यास रू 100/- चे अंशदान द्यावे लागेल. केंद्र शासनाकड़ून तेवढयाच रकमेचे म्हणजे रू100/- चे अंशदान केले जाईल.
सहयोगीचे अंशदान— सहयोगीचे अंशदान तयाच्या बचत बॅंक खाते/जनधन खाते यामधून ‘ऑटो डेबिट’ सुविधेच्या माध्यमातून केले जाईल. पीएम-एसवायएम योजनेत सामिल होण्याच्या वयापासून 60 वर्षे वयापर्यंत सहयोगीस ठराविक अंशदान रक्कम द्यायची आहे. खालील तक्त्यात प्रवेशाच्या वयानुसार मासिक अंशदानाचे विवरण दिले आहे.
नाव नोंदणीची माध्यमे—नाव नोंदणी सार्वजनिक नागरी सेवा केंद्रा द्वारा केली जाईल. असंघटित कामगार आधार कार्ड तसेच बचत बॅंक खाते, पासबुक/जनधन खाते यासह जवळच्या सीएससीकड़े जाऊन योजनेसाठी आपली नावनोंदणी करू शकतात पहिल्या महिन्याची अंशदानाची रक्कम रोख स्वरूपात केली जाईल व याची पावती दिली जाईल. मदत केंद्र ईपीएफओ ची कार्यालये, एलआयसीची सर्व शाखा कार्यालये, इएसआईसी ची कार्यालये तसेच राज्य आणि केंद्र शासनाची सर्व कामगार कार्यालये येथे असंगठित श्रमिकांना योजना, तिचे लाभ आणि प्रक्रियेची माहिती दिली जाईल.
अंशदानात कसूर- जर सहयोगीने नियमित रूपात आपले अंशदान जमा केले नसेल शासनाकड़ून निश्चित केलेल्या दंड राशीसह पूर्ण देय रक्कम भरून आपले अंशदान नियमित करता येईल.
योजनेतून बाहेर पडणे व परतावा- असंगठित कामगारांच्या रोजगाराचे अनिश्चित स्वरूप पाहता योजनेतून बाहेर पडण्याच्या पद्धतीत लवचिकता ठेवण्यात आली आहे. योजनेतून बाहेर पडण्याबाबतची कार्यपद्धती पुढील प्रमाणे आहे-
• जर सहयोगी 10 वर्षापेक्षा कमी कालावधीत योजनेतून बाहेर पड़ल्यास त्याला/तिला केवळ सहयोग्याचा अंशदान हिस्सा बचत बॅंक व्याजदरासह दिला जाईल.
• जर सहयोगी 10 वर्ष/त्यापेक्षा अधिक कालावधीनंतर परंतु वयाची 60 वर्ष पूर्ण होण्याआधी योजनेतून बाहेर जडल्यास सहयोगीस त्याच्या अंशदानाच्या हिश्श्यासह कोषामार्फत मिळालेले व्याज/बचत बॅंक व्याज दरानुसार व्याज यापैकी जे अधिक असेल ते दिले जाईल.
• जर सहयोगीने नियमित अंशदान केले आहे आणि काही कारणाने त्याचा मृत्यू झाला तर त्याचा जोड़ीदार नियमित अंशदान करून या योजनेस पुढे चालवू शकतो किंवा कोषामार्फत मिळालेले व्याज/ बचत बॅंक वयाजदरानुसार देय व्याज यापैकी जे अधिक असेल त्यासह सहयोगीचा हिस्सा प्राप्त करून योजनेतून बाहेर पड़ू शकतो.
• जर सहयोगीने नियमित अंशदान केले आहे आणि वयाची 60 वर्ष पूर्ण होण्याआधी काही कारणास्तव कायमस्वरूपी दिव्यांग झाला व योजनेंतर्गत अंशदान करण्यास असमर्थ झाला तर त्याचा जोड़ीदार नियमित अंशदान करून या योजनेस पुढे चालवू शकतो किंवा कोषामार्फत मिळालेले व्याज/ बचत बॅंक वयाजदरानुसार देय व्याज यापैकी जे अधिक असेल त्यासह सहयोगीचा हिस्सा प्राप्त करून योजनेतून बाहेर पड़ू शकतो
• सहयोगी आणि त्या जोड़ीदार दोघांचाही मृत्यू झाल्यास संपूर्ण रक्कम कोषात जमा होईल.
• एनएसएसबी च्या सल्ल्यानुसार शासनाकड़ून निश्चित योजनेतून बाहेर पड़ण्यासंबंधी इतर अन्य प्रावधान
अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी सहायक कामगार आयुक्त, अकोला आणि सहायक आयुक्त, कर्मचारी भविष्य निधी कार्यालय निधी अकोला क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे संपर्क साधावा.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola