अकोला (प्रतिनिधी): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. तसेच पेरणी ते पीक काढणी या प्रत्येक टप्प्यावर पेरणी क्षेत्र, हवामान, पिकांवरील रोग अशा विविध बाबी डिजिटली ट्रॅक करुन शेतकऱ्यांना माहिती देणाऱ्या देशातल्या अशा प्रकारच्या पहिल्या ‘महा ॲग्रीटेक’ योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात केला.
उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या या उपक्रमामुळे वेळीच माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना उपाययोजना करणे शक्य होणार आहे. एमआरसॅक आणि इस्त्रोच्या सहाय्याने राज्य शासन हा कार्यक्रम अंमलात आणत आहे.
लोकसंवाद कार्यक्रमासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्ही.सी. सभागृहात अकोला जिल्हयातील विविध कृषी योजनांचा लाभ घेतलेले प्रवीण दांदळे, खीरपूर, ता. बाळापूर, वर्षाताई केशवराव ठाकरे, कान्हेरी सरप, ता. बार्शीटाकळी, विनोद भटकर, पाटखेड, ता. बार्शीटाकळी, उमेश रमेश फुलारी, पातूर, शंकररावी लहामगे, आलेगाव, ता. पातूर, पुरुषोत्तम दिनकर चतरकर, कापशी रोड, ता. अकोला, महेंद्र धर्माजी चक्रनारायण, अकोला, महेंद्र अरुणराव काळे, सांगळूद, ता. अकोला, भीमराव सदाशिव, यावलखेड, ता. अकोला, प्रवीण पंजाबराव खोत, समशेरपूर, ता. मूर्तिजापूर, विठठल आनंदराव वाकोडे, जामडी खू, ता. मूर्तिजापूर, सतीश अशोक बोंद्रे, शिवापूर, नेव्हरी, ता. अकोट, सत्यनारायण गोविंदराव म्हसाये, वारखेड, ता. तेल्हारा, दिनेश श्रीराम देवकर, तळेगाव खु. ता. तेल्हारा आदी लाभार्थी उपस्थित होते.
राज्य शासनातर्फे सुरु करण्यात आलेल्या ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधला. शेतात राबून विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून प्राप्त झालेल्या स्वावलंबनाच्या यशोगाथा शेतकऱ्यांनी यावेळी सांगितल्या. शेतीशी निगडित योजना ऑनलाईन केल्यामुळे गैरव्यवहारांना आळा बसला, पारदर्शकता आली, असे अनुभव शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. सुमारे तीन तास मुख्यमंत्री राज्यभरातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संवाद साधत होते. त्यांच्या अडचणी जाणून घेत होते. काही शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे सांगत मुख्यमंत्री शेतकऱ्यांना दिलासा देत होते.
‘महाॲग्री टेक’ कार्यक्रमाविषयी माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यांमधील रब्बी हंगामातील पीक नियोजन, पीकनिहाय पेरणी क्षेत्र यासंदर्भात संगणकीय प्रणाली सुरु करण्यात आली आहे. शेती क्षेत्रात येणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर या कार्यक्रमांतर्गत केला जाणार आहे. राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणले जाईल. उपग्रहाच्या मदतीने पीकनिहाय क्षेत्राचे मापन करताना पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत पिकांच्या वाढीचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील डाळींब सोबत आणले होते. ते पाहून मुख्यमंत्री म्हणाले, डाळींब खूप छान दिसताय. पाहताच खायची इच्छा होतेय. अशी स्तुती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जालना, पालघर, अहमदनगर, परभणी, वाशिम, गोंदीया, सोलापूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, जळगाव, यवतमाळ आदी जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी आज लोकसंवाद कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र शास्त्री, श्री. शास्त्रकर आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : सेठ बन्सीधर संस्थेमध्ये चिमुकल्यांचे रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांनी फेडले डोळ्यांचे पारणे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola