अकोला (प्रतिनिधी): काटेपूर्णा येथे बुधवारी दुपारी १४९ उंटाचा काफिला दिसून आला. या उंटाची तस्करी होत असल्याच्या संशयावरून बोरगाव मंजू पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जावून चौकशी केली. त्यानंतर या उंटाच्या मालकांना ताब्यात घेऊन त्यांचे बयाण घेतले व उंटांना सोडून दिले. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात पकडण्यात आलेले उंट चोरीचे असल्याचे तपासात पुढे आले होते.
गुजरातमधील कच्छ येथून १४९ उंटांना घेऊन तीन महिन्यापूर्वी काही लोक दर कोस दर मुक्काम निघाले होते. गेल्या महिन्यात तस्करीसाठी जाणाऱ्या उंटांना पकडल्याची घटना ताजीच असताना या उंटांना सुद्धा कत्तलीसाठी नेण्यात येत असावे, अशी माहिती छावा संघटनेचे विजय विजयकर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती बोरगाव मंजूचे ठाणेदार विजय मगर यांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी उंटांना घेवून जाणाऱ्यांची कसून चौकशी केली. सुरुवातीला उंटांना घेऊन जाणाऱ्यांकडे कोणतेही कागदपत्र नसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर iवेगवेगळ्या इतर उंटाच्या तांड्यातील माणसे व उंटाचे मालक पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता दरवर्षी मेंढपाळांना उंट देण्यात येतात, त्यानुसार यंदाही ते उंट मेंढपाळांना देण्यासाठी आणल्याची माहिती पोलिसांना देण्यात आल्याने व पोलिसांची खातरजमा झाल्याने त्यांनी उंटाचा काफिला सोडून दिला.
मालकांना ताब्यात घेऊन केली विचारपूस
काटेपुर्णा येथे उंटाचा काफिला पकडल्यानंतर पोलिसांनी मालकांचे बयाण घेतले. राजस्थानातून देशासह परदेशात हजारो उंटांची दरवर्षी तस्करी होते. १५ हजारात राजस्थानात मिळणाऱ्या उंटांची किंमत पुढे जाऊन लाखोत जाते. खाडी देशात उंटांच्या मांसाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. राजस्थानमधील मालदा, सिलिगुडी, बागपत यूपी बॉर्डर, किशनगंज हे उंटांच्या तस्करीचे केंद्र आहेत.
उंटाची तस्करी नाही, उंट गुजरातमधून निघाले
हे उंट तीन महिन्यांपूर्वी गुजरातमधून निघाले असून ते राजनांदगाव छत्तीसगड येथे नेण्यात येतात. या मार्गाने या उंटाच्याच मालकांचे मेंढ्यांचे कळप आहेत. प्रत्येक कळपाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ओझे वाहून नेण्यासाठी प्रत्येकी कळप चार-पाच उंट ते देतात. चौकशीतून हे लोक धार्मिक वृत्तीचे असून ते कत्तलीसाठी उंट विकत नाहीत. उंटांना लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न पाहता उंट सोडून दिले असून, त्यांच्या मालकांचे बयान घेतले व आणखी चौकशी सुरु आहे. – विजय मगर, ठाणेदार बोरगाव मंजू
गेल्या महिन्यात पकडले होते ५८ उंट
राजस्थान येथून कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येत असलेल्या ५८ उंटांना पातूर तालुक्यातील चिंचखेड फाट्याजवळ तेलंगणा येथील वन्यजीव संरक्षण विशेष अधिकारी यांनी १२ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले होते. या उंटांना राजस्थानमध्ये परत पाठवण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर सदर ५८ उंटांना राजस्थानमध्ये परत पाठवले होते. हे उंट राजस्थानमधून चोरी करून आणल्याचे तर काही खरेदी केल्याचे समोर आले होते.
अधिक वाचा : अकोला मनपाच्या अतिक्रमण विभागाची कारवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola