अकोला (प्रतिनिधी)- रस्त्यात कोठेही वाहन उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी वाहने जप्त करण्याच्या कारवाईला कोणाचाही विरोध नाही मात्र या टोईंग पथकाच्या कारवाईत दिवसेंदिवस होत असलेल्या अतिरेकपणामुळे सर्वांच्या संयमाचा बांध सुटला आणि या प्रश्नाला वाचा फुटली. टोईंग पथकाला लगाम लावण्यासाठी आ. बाजोरीया यांच्या नेतृत्वात येत्या आठवड्याभरात कारवाईची रूपरेषा निश्चित होईल, असा विश्वास वाहनधारकांना वाटू लागला आहे. शहरातील बाजारपेठेत आणि महत्वाच्या ठिकाणी वाहन ठेवण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे वाहनधारकांना नाईलाजास्तव रस्त्याच्या कडेला दुरवर वाहन उभे करावे लागते आणि अशा पद्धतीने ठेवलेल्या वाहनांपासून वाहतुकीला कुठलाही अडथळा नसतांना, टोईंग पथकवाले सर्रासपणे येथून वाहन उचलून नेतात.
विशेष शहरात पार्कींगची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची असून प्रशासन यासाठी आजही उदासिन आहे, तर केवळ पिवळे पट्टे नसल्यामुळे टोईंग पथक कारवाईत अतिरेकपणा करीत आहे. वाहतुकीला अडथळा करणारी वाहने जप्त करण्यात काहीही गैर नाही मात्र पार्कींगची व्यवस्था नसल्याने आणि रस्त्याच्या किती फूटपर्यंत वाहन ठेवावे याची सिमा मर्यादा आखून दिली नसल्याची बाब टोईंग पथकाच्या पथ्यावर पडत आहे. टोईंग पथकाची दादागिरी एवढी वाढली की, बसस्थानकाच्या परिसरातून वाहन उचलून नेतात. अखेर आगर व्यवस्थापकांनी आदेश काढून टोईंग पथकाला इशारा देखील दिला आहे.
वाहतुकीला लगाम लावण्यासाठी वाहतूक शाखेचे निरीक्षक विलास पाटील प्रयत्न करीत आहेत यात शंका नाही, मात्र पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्याकडून देखील पिवळे पट्टे तयार करून घेण्यासाठी कुठलिही कारवाई मागील एक वर्षापासून करून घेण्यात आली नाही. शहरातील प्रमुख ठिकाणांवर वाहनतळाची व्यवस्था असल्या आणि नसल्यासारखी आहे. रस्त्यावर उभी असलेली वाहने जप्त करण्यासाठी कार्यान्वीत टोईंग पथकाची कारवाई नियमानुसार करण्यासाठी जागेची मर्यादा आखून देण्याचा प्रयत्न आजपर्यंत प्रशासनाकडून का झाला नाही? टोईंग पथकासोबत अनेकदा वाहतूक पोलिस नसल्याने कारवाईत अतिरेकीपणा होत आहे. रस्त्याच्या कडेला किती अंतरापर्यंत वाहन उभे करावे यासाठी पिवळे पट्टे काढण्याचा नियम असून, पिवळ्या पट्ट्याच्या मर्यादेबाहेर उभ्या असलेल्या गाड्या जप्त करण्याचा टोईंग पथकाला अधिकार आहे. मात्र आजपर्यंत पिवळे पट्टे तयार करून देण्यात आले नाही. अमरावती प्रमाणे गाडी जप्त केली की त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाने किंवा खडूने चौफुलीची निशाणी केली की वाहन टोईंग पथकाने जप्त केल्याचे वाहन धारकांच्या लक्षात येते. मात्र ही पद्धत देखील अकोल्यात अंमलात आणण्यात आली नाही. कायद्याचे पालन करणे आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याची सर्वांच्या मनात भावना आहे. परंतु टोईंग पथक प्रमुख अक्षरश: गुंडगिरी करीत असल्याने महिला, पुरूष, वयोवृद्ध, शाळकरी मुले, रूग्ण, रूग्णांचे नातेवाईक, अधिकारी आणि व्यावसायीक अक्षरश: वैतागले आहे. वाहतूक शाखेने आधी स्वत: पिवळ्या पट्ट्याचे पालन करणे आवश्यक आहे. टोईंग पथक कंत्राटदार स्वत:ला चुलबुल पांडे समजू लागल्याने पोलिस प्रशासनाची इभ्रत वेशीवर टांगल्या जात आहे.
तेव्हा, पोलिस अधीक्षकांनी या बाबतीत तातडीने कठोर निर्देश देण्याची मागणी वाहनधारक करीत आहे. त्रस्त वाहन धारकांची आ. बाजोरीया यांच्याकडे धाव :लवकरच बैठक घेणार टोईंग पथकाकडून हमखास रविवारी वाहन जप्त करण्याची कारवाई केल्या जाते. मागील एक वर्षापासून रविवारी होणाऱ्या कारवाईमुळे सर्वचजण त्रस्त झाल्यामुळे, आज भाजी बाजारात पुन्हा कारवाईचा अतिरेक झाल्यामुळे अनेक वाहनधारकांनी चक्क आ. बाजोरीयांच्या कार्यालयात धाव घेतली. मागील अनेक महिन्यापासून टोईंग पथकाच्या कारवाईला घेवून आ. बाजोरीया यांच्याकडे तक्रारी येत होत्या. गत काही दिवसापूर्वी रूग्णांच्या नातेवाईकांचे वाहने जप्त केल्याच्या तक्रारी देखील त्यांच्याकडे आल्या होत्या.
अखेर सर्वांच्या सयंमाचा बांध फुटल्याने सर्वांनी आ. बाजोरीया यांना वाहतूक शाखेमध्येच नेले. या ठिकाणी वाहतूक शाखेचे निरीक्षक विलास पाटील घरगुती कारणाने सुटी असल्याकारणाने विस्तृत चर्चा झाली नाही. परंतु टोईंग पथक कंत्राटदार पांडे यांना चांगलेच झापले आणि पोलिस अधीक्षकांसोबत मोबाईलवर होत असलेल्या कारवाईबाबत चर्चा केली. तेव्हा, लवकरच वाहतूक शाखा आणि महानगरपालिका यांच्यासोबत संयुक्त बैठक घेवून, कारवाईची योग्य रूपरेषा निश्चित केल्या जाईल, असे आश्वासन पोलिस अधीक्षक कलासागर यांनी दिले. टोईंग पथकाच्या कारवाईला घेवून आ. बाजोरीया वाहतूक शाखेत गेल्याचे कळताच अनेक वाहनधारक देखील त्या ठिकाणी पोहोचले. सर्वांनीच कारवाईच्या अतिरेकपणाला घेवून त्या ठिकाणीच टोईंग पथक कंत्राटदाला खडेबोल सुनावले. तेव्हा ही बाब गंभीर असल्याने येत्या आठवड्यात याबाबत निश्चितच बैठक घेवू, असे आश्वासन आ. बाजोरीया यांनी सर्वांना दिले. यावेळी आ. बाजोरीया यांच्यासोबत आ. विप्लव बाजोरीया, अकोला पश्चिम महानगर प्रमुख राजेश मिश्रा, संतोष अनासने, युवासेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील, माजी नगरसेविका राजेश्वरी अम्मा, नगरसेवक गजानन चव्हाण, नगरसेवक शशी चोपडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक बोचरे आणि योगेश बुंदिले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. टोईंग पथकाला लगाम लावण्यासाठी पिवळ्या पट्ट्याची मार्कींग हवीच रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक शाखेच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या टोईंग पथकाच्या कारवाईनंतर जागेवर गाडी न दिसल्याने वाहनधारकाला धक्का बसतो. बाहेरगाववरून आलेल्यांना वाहन चोरीला तर गेले नाही ना, या विचाराने घामच सुटतो. केवळ पिवळे पट्टे नसल्यामुळे वाहन कोठे ठेवावे याचा, वाहनधारकाला अंदाज येत नाही. टोईंग पथकाला योग्य समज न मिळाल्याने त्यांच्या कारवाईत देखील अतिरेकपणा वाढत आहे.
अनेकदा वाहन धारक आणि टोईंग पथकाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादही होतो. दिसली गाडी की टाक गाडीत या वृत्तीने टोईंग पथकाकडून होणाऱ्या कारवाईत दुचाकी वाहनांचे नुकसान देखील होत असून, सर्वच अकोलेकर त्रस्त झाले आहेत. टोईंग पथकातील कर्मचाऱ्यांना एका गाडीमागे एक निश्चित रक्कम मिळत असल्याने, अडथळा नसलेले वाहन देखील घेवून जातात. टोईंग पथक केवळ अकोल्यात नसून जवळपास सर्वच शहरांमध्ये कार्यरत आहे मात्र या शहरांमध्ये पिवळे पट्टे करून जागा निर्धारीत करून देण्यात आल्यामुळे कुठेही कारवाईचा अतिरेक होत नाही. पिवळ्या रंगाचे पट्टे करून सिमा निर्धारीत करून देणे टोईंग पथकाच्या कारवाईसंदर्भात नियम देखील आहे. तेव्हा अकोला शहरात पिवळे पट्टे का केल्या जात नाही, याचा पोलिस अधीक्षकांनी विचार करावा.
अधिक वाचा : शेतक-यांनी आर्थिक उन्नतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे -उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola