अकोला (प्रतिनिधी): पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आज झालेल्या या उपक्रमात विविध विभागांच्या 382 तक्रारी प्राप्त झाल्या. या सभेच्या माध्यमातून तक्रारदारांना दिलासा मिळाला असून अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी स्वत: लोकांकडे जाऊन त्यांच्या तक्रारी स्विकारल्या. यावेळी त्यांनी तक्रारदारांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन तक्रारींचा 15 दिवसाच्या आत निपटारा करण्यात येईल, असा दिलासाही त्यांना दिला.
जनतेच्या तक्रार निवारण सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा परिषदचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश कुळकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी उज्वल चोरे आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री यांनी सार्वजनिक प्रश्नांच्या तक्रारी स्विकारल्या. यामध्ये कानशिवनी येथील अतिक्रमण हटविणे, हिवरखेड येथे पाणंद रस्त्याचा प्रश्न, मनपा क्षेत्रात आलेल्या भागात मुलभूत सुविधा पुरविणे, तांदुळी खुर्द, ता. पातुर येथील शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळणे आदी महत्त्वाच्या तक्रारींचा समावेश होता, या तक्रारी तातडीने सोडविण्यात याव्यात, असे निर्देश यावेळी पालकमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान येथील मामा-भांजे डोहावर जाळी टाकण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यानंतर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन आलेल्या अर्जदारांचे निवेदने स्वत: तक्रारकर्त्याकडे जावून स्विकारले. 15 दिवसाच्या आत सबंधीत विभागाकडून आपणास आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली या बाबतचा अनुपालन अहवाल कळविण्यात येईल. अशी तक्रारकतर्यांना ग्वाही दिली. व संबंधीत अधिका-यांना तशा सुचना दिल्यात. जनतेच्या तक्रारीचे व्यवस्थीत समाधान व्हावे हा या उपक्रमामागचा उददेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले.
पालकमंत्री यांनी विभागनिहाय तक्रारी स्विकारल्या. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसमक्ष तक्रारकर्त्यांचे म्हणने ऐकून घेत अधिकाऱ्यांना तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली. अकोला तालुक्यातील आगर येथील नगांबाबा मंदिरासमोरील अतिक्रमण हटविण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने जागेची मोजणी तातडीने करुन दयावी व ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटवावे, असे प्राप्त तक्रारीवर निर्देश दिले. अन्वी मिर्जापूर येथे पाणंद रस्ता तयार करुन देण्याच्या गजानन वसू यांच्या तक्रारीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली.
बाळापूर तालुक्यातील मौजे सांगवी (जोमदेव) येथील ग्रामपंचायत प्रशासन व सचिवांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील 42 लाभार्थ्यांना हेतुपुरस्सर डावलल्याची तक्रार नागरिकांनी केली, यावर संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देण्याची सूचना पालकमंत्री यांनी केली. अकोल्यातील शिवहरी शिवलाल पारसकर यांच्या प्लॉटची मोजणी सोमवारपर्यंत करण्याबाबत त्यांनी भूमिअभिलेख विभागाला आदेशित केले. पातुर तालुक्यातील वाहळा बु. चांदणी, खेट्री, पिंपळखुर्द, तळेगाव, येथील शेतकऱ्यांनी सामुहिक शेततळयांसाठी ऑफलाईन अर्ज स्विकारण्याबाबतची मागणी केली. यावर अर्ज ऑनलाईन स्विकारण्यासाठी शासनस्तरावर आपण प्रयत्न करु, पालकमंत्री यांनी सांगितले. अकोट तालुक्यातील कातखेड येथील गजानन वैराळे या शेतकऱ्याला ठिंबक सिंचनची सबसिडी तातडीने दयावी, अशी सूचना त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना केली. अशा वेगवेगळया प्रकारच्या तक्रारींवर पालकमंत्री यांनी निर्देश देऊन नागरिकांना दिलासा दिला.
जिल्हा परिषदेशी निगडीत आजपर्यंतच्या प्राप्त तक्रारीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले. तसेच विदयुत विभागाशी संबंधित तक्रारींबाबत स्वत: महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दर सात दिवसाला आढावा घेऊन तक्रारी मार्गी लावण्याची सूचना त्यांनी केली.
आज झालेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेत एकूण 382 तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामांबाबतच्या लेखी स्वरूपातील तक्रारी नागरिकांनी पालकमंत्री यांना दिल्या. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाप्रमुखांकडे विचारणा करुन त्याचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचित केले. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी मागील सभेत प्राप्त तक्रारींवर अधिका-यांनी काय कार्यवाही केली याबाबत चौकशी केली. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारदारांचे समाधान झाले का, याची विचारणा त्यांनी तक्रारदारांना करुन पुढील तक्रारी स्विकारण्यास सुरुवात केली.
अधिक वाचा : प्रहार जनशक्ती पक्षाने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केले ठिय्या आंदोलन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola