अकोला (प्रतिनिधी): भारिप बहुजन महासंघ काँग्रेससोबत युती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी भारिपसोबत ४ बैठका झाल्या आहेत. भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी अकोल्याची जागा सोडण्यास काँग्रेसची तयारी आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी दिली. अकोल्यात जनआक्रोश यात्रेनिमित्त ते आले होते.
काँग्रेससोबत आघाडीसाठी चर्चा केली नसल्याचे आंबेडकर म्हणत असतील तर ते खोटे आहे, असा दावा चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्यासोबत 4 वेळा बैठका झाल्या असून आम्ही त्यांना अकोला लोकसभेची जागा सोडण्यास इच्छूक असल्याचे सांगितले. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात आघाडीची चर्चा सुरू असून २६ व २२ असा फार्म्युला राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ज्या मित्रपक्षाला त्यांच्या मित्रांना जागा द्यायच्या आहेत त्यांनी त्यांच्या कोट्यातून द्याव्यात, असाही निर्णय झाल्याचे ते म्हणाले. देशपातळीवर स्थानिक आघाड्या करण्यावर भर घालण्यात आला आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या १०० जागा कमी होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
देशातील लोकशाही व्यवस्था मोडकळीस आली आहे. यापुढे नरेंद्र मोदींचे सरकार आल्यास भविष्यात ना निवडणुका होतील ना संविधान टिकेल, अशी भीती काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. १९७५मध्ये इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी चूक होती, असे मान्य करत काँग्रेसची राज्यात संघर्ष यात्रा सुरू असून यातून काँग्रेसचा उत्कर्ष होईल व लोकशाही टिकेल, असा विश्वास व्यक्त केला. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणात ना खरेदी व्यवहार झाला, ना खरेदी झाली असे म्हणत अटक करण्यात आलेल्या ख्रिश्चियन मायकलला माफीचा साक्षीदार करत त्याच्या तोंडून राजकीय नावे वदवून घेण्याचा प्रकार असल्याची टीका केली आहे.
सरकारकडून सीबीआयचा सोईस्कर वापर करत सोनिया गांधी, राहुल गांधींसह इतर नेत्यांना गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला, तर सीबीआय चौकशीची भीती दाखवत राज्यातील एका माजी मुख्यमंत्र्यांनी भाजप प्रवेश केल्याचा दावा करत त्यांनी नारायण राणेंचे नाव घेणे टाळले. सरकारने मराठा आरक्षणावर घेतलेल्या निर्णयाचे चव्हाणांनी स्वागत केले. पण त्याचवेळी गेल्या ५० वर्षांतील मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस सरकारला गुण देण्यात मात्र त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर काटकसर केली. राफेल विरोधातील बातम्यांबाबत माध्यमांची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. दुष्काळ जाहीर करण्यात राज्य सरकारने उशीर केला. या संघर्ष यात्रेतून काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा करून हितगुज सुरू आहे व जनतेशी संवाद सुरू आहे, असेही चव्हाण म्हणाले.
व्हिडिओ : अकोल्यासह जिल्ह्याभरात महापरिनिर्वाण दिनानिमित्य महामानवाला अभिवादन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola