मुंबई : राज्याची भौगोलिक परिस्थिती आणि हवामान अंदाज पहाता रेशीम शेती ही शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. या शेतीसाठी कमी खर्च लागतो आणि पाण्याचे प्रमाण कमी असतानाही उत्पादन येते. त्यामुळे रेशीम शेती ही ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी फायदेशीर आहे, असे वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
श्री. देशमुख म्हणाले, राज्यामध्ये तुती रेशीम व टसर (वन्य) रेशीम असे दोन प्रकारचे रेशीम उद्योग आहेत. तुती रेशीम उद्योग पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागात एकूण 24 जिल्ह्यात सुरु आहेत. तर टसर रेशीम उत्पादन प्रामुख्याने नागपूर विभागातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्यात घेतले जाते. इतर पिकांच्या तुलनेत तुती रेशीम उद्योग शेतकऱ्यांनी केल्यास त्यांचे उत्पादन दोन वर्षात दुप्पट होते. ऊस, केळी, द्राक्षे, कापूस, सोयाबीन, संत्रा या पिकांचे उत्पादन पाहता शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याची क्षमता रेशीम उद्योगामध्येच आहे. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग करावा.
रेशीम कोषाला बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. सद्यस्थितीत कोषाचे दर 300 ते 350 रुपये प्रतिकिलो आहेत. एकदा तुती लागवड केल्यानंतर ही लागवड ही 10 ते 15 वर्ष टिकते आणि दुसऱ्या वर्षापासून सरासरी 4 ते 5 पिके घेता येतात. तुती लागवडीवर अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारांचा पाऊस इत्यादी नैसर्गिक आपत्तीचा परिणाम होत नाही. तसेच तुतीच्या पानाचा उपयोग दुभत्या जनावरांसाठी सुद्धा करता येतो. तुती रेशीमवर कुठल्याही प्रकारचे औषध फवारणी नसल्यामुळे तसेच सेंद्रीय खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची कस टिकून राहते. त्यासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळले पाहिजे असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola