अकोला :- ‘जगी ऐसा बाप’ व्हावा’ व ‘नानी’ हे दोन चरित्रग्रंथ चांगले डॉक्युमेंटेशन असून, उपेक्षित समाजामध्ये जन्मून सामान्यामधून असामान्य माणसे कशी होतात हे शिकविणारे, वृद्धाश्रम फोफावणार्या या काळामध्ये मातृ व पितृऋण याची शिकवण देणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असा सूर रविवारी आयोजित परिसंवादात उमटला. महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता तथा साहित्यीक डॉ.मुरहरी केळे लिखित ‘जगी ऐसा बाप’ व्हावा’ व ‘नानी’ या दोन चरित्रग्रंथावरील परिसंवादाचे आयोजन एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात २१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.
अंकुर साहित्य संघ व संस्कृती प्रकाशन यांनी आयोजित केलेल्या परिसंवादाच्या व्यासपीठावर अध्यक्ष लोकसाहित्याचे अभ्यासक, संशोधक तथा महात्मा जोतीराव फुले अध्यासन केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणेचे अध्यक्ष डॉ.विश्वनाथ शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समीक्षक व प्राध्यापक,मराठी विभाग,सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील मा.डॉ.मनोहर जाधव तर भाष्य करण्यासाठी समीक्षक, वक्ते व गाडगे महाराज महाविद्यालय,मुर्तीजापूरचे माजी प्राचार्य डॉ.श्रीकांत तिडके व समीक्षक,कवी,वक्ते व विनायकराव पाटील महाविद्यालय,वैजापूर, जि. औरंगाबाद, येथील मराठी विभाग प्रमुख मा.डॉ.महेश खरात आणि आदर्श महाविद्यालय, अकोलाचे माजी प्राचार्य बापुराव झटाले यांचेसह साहित्यीक डॉ.मुरहरी केळे, संस्कृती प्रकाशनच्या मनीषा केळे, हास्यकवी अरविंद भोंडे व उद्योजक जयसिंह चव्हाण उपस्थित होते.
आपण हे दोन्ही पुस्तके हे फक्त माझे आईवडील आहेत म्हणून त्यांच्यावर लिहिली नसून त्यांनी केलेले कार्य, संघर्ष व दृष्टीकोन समाजामासमोर यावा. आईवडीलांचे महत्व नव्या पिढीला समजावे हा उद्देश असल्याचे लेखक डॉ.मुरहरी केळे यांनी यावेळी सांगितले. या दोन्ही चरित्र ग्रंथामध्ये गुण व दोष दोन्ही सांगण्यात आले असून सत्यता व वास्तविकतेवर आधरित ही पुस्तके मानवाच्या उद्दात्त प्रवृत्तीला प्रेरणा देणारी आहेत.
सोपानराव सारख्या निरक्षर माणसाला त्यावेळी योग्य संधी मिळाली असती तर मामासाहेब दांडेकर यांचे समान उंची गाठू शकले असते असे भाष्य बापुराव झटाले यांनी केले. नानी व काका हे संघर्षातून मोठे झालेले हे दोन्ही व्यक्तिमत्त्व असून, सोपानदेव निरक्षर असून सुद्धा संतपदापर्यंतचा प्रवास नानीशिवाय शक्य नव्हता, या दोन्ही पुस्तकातून लेखकाने साहित्यिक होण्याची मान्यता मिळवण्याबरोबरच मातृ व पितृऋण फेडले असे भाष्य डॉ.श्रीकांत तिडके यांनी केले.
ही दोन्ही पुस्तके निर्माण होण्याचे कारण लेखकावर झालेले तत्कालीन संस्कार असून या संघर्षयात्रेमुळे वैयक्तिक यशाबरोबर या दोघांना कायम जिवंत ठेवण्याचे कार्य डॉ. केळे यांनी केल्याचे भाष्य डॉ.महेश खरात यांनी केले. आई व बापाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारी ही पुस्तके म्हणजे योग्य डॉक्युमेंटेशन असून, तत्कालीन संघर्ष हेलावून टाकणारा असून समाज वाचण्याची दृष्टी सोबतच अशाप्रकारे लिखाण करण्याची प्रेरणा देणारी ही पुस्तके असल्याचे मत डॉ.मनोहर जाधव यांनी व्यक्त केले.
‘देव पहावयास गेलो आणि देव होवूनिया गेलो’ अशाप्रकारची हि चरित्रे असून समाजाची संस्कृती व तत्कालीन चित्रण यासोबतच उपेक्षित समाजातील माणसे विदारक परिस्थितीतून श्रेष्ठत्त्वाला पोहोचण्याचे हे कार्य यामधू समाजासमोर मांडले असल्याचे मत डॉ.विश्वनाथ शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणातून मांडले. प्रास्ताविक अरविंद भोंडे यांनी तर सूत्रसंचालन विकास आढे व संजीवनी हिंगणे अठराळे यांनी केले. आभार डॉ प्रमोद काकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतगीत व शेवटी पसायदान राजेश्वरी जोशी यांनी गायिले. या परिसंवादाला साहित्यिक, रसिक, विविध क्षेत्रातील मान्यवर व श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola