अकोला (शब्बीर खान) : अकोला शहरासह जिल्ह्यातील रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला लागलेल्या औषधांच्या तुटवड्याचे ग्रहण सुटण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.
गत वर्षभरापासून असलेला औषधांचा तुटवडा अजूनही कायमच असून, बाह्य उपचार कक्षात (ओपीडी) येणाऱ्या रुग्णांना सर्रास चिठ्ठ्या लिहून बाहेरून औषधे खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे गरीब रुग्णांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सर्वोपचार रुग्णालयात संपूर्ण अकोला जिल्हा, लगतचा वाशिम, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून रुग्ण उपचारासाठी येतात. येथील ओपीडीमध्ये दिवसाकाठी किमान १२०० ते १४०० रुग्णांची नोंद होते. आंतररुग्ण विभागातील विविध वॉर्डांमध्येही मोठ्या संख्येने रुग्ण भरती आहेत.
सध्या डेंग्यू, स्क्रब टायफस या कीटकजन्य व स्वाइन फ्लू व इतर विषाणूजन्य आजारांनी धुमाकूळ घातल्याने सर्वोपचारमधील रुग्णांची संख्या वाढली आहे. येथे येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत औषधांचा साठा कमी असल्याने अनेक रुग्णांना चिठ्ठी लिहून बाहेरून औषधे घेण्यास सांगितले जात आहे. आठ कोटींपैकी निम्माच निधी मिळाला! शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात औषधे व साहित्य खरेदी तसेच इतर बाबींसाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पाठपुरावा करून मागच्या महिन्यात आठ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. यापैकी रुग्णालय प्रशासनाकडे फक्त ३ कोटी ८७ लाख रुपयेच प्राप्त झाले आहेत. यामधून औषध पुरवठादारांची जुनी देयके देण्यात आली आहेत.
शासनाचा निधी प्राप्त झाल्यानंतर औषधांची खरेदी होऊन परिस्थिती सुधारेल, असे वाटले होते; परंतु निधी मिळून तीन आठवड्यांचा कालावधी उलटूनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांना छेडले असता, येत्या दोन ते तीन आठवड्यात औषध पुरवठ्याची स्थिती सुधारेल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
अधिक वाचा : रस्त्यांच्या दर्जा तपासणीचा अहवाल दोन दिवसांत येणार; कोण दोषी, निर्दोष कळणार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola