अकोला (प्रतिनिधी) : शहरातील रस्त्यांची गुणवत्ता निश्चित करणारा सोशल ऑडिट रिपोर्ट येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर केला जाणार आहे. मानवी शरीराच्या पोस्टमार्टमसारख्या या अहवालामुळे कोण निर्दोष आणि कोण दोषी हेही स्पष्ट होणार आहे. परिणामी या रस्त्यांचे बांधकाम पूर्ण केलेल्या कंत्राटदार व यंत्रणांमध्ये धास्ती दाटली असून अहवालाच्या घोषणेनंतरच दोषी-निर्दोषचा उलगडा होणार आहे.
या अहवालाबाबतचे नोडल ऑफिसर एसडीओ संजय खडसे यांच्या माहितीनुसार तीन यंत्रणांमार्फत रस्त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली होती. यापैकी सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे विभाग या दोन यंत्रणांनी त्यांचा अहवाल सादर केला आहे. अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गुण नियंत्रण विभागाचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. तो मंगळवारी प्राप्त होईल. त्यानंतरच शहरातील रस्त्यांच्या वाईट स्थितीस जबाबदार कोण, याचा उलगडा होईल.
शहरातील सिमेंट व डांबरी रस्त्यांची स्थिती फार कमी कालावधीत खराब झाल्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख रस्त्यांचे सुमारे ७३ सॅम्पल्स घेण्यात आले होते. त्यांचा या तपासणी अहवालात समावेश आहे. २२ ते २७ जुलै या कालावधीत शहरातील सिमेंट रस्त्यांचे सोशल ऑडिट करण्यात आले. या प्रक्रियेअंतर्गत प्रत्येक रस्त्याचे नऊ सॅम्पल (कोअर मटेरियल) घेण्यात आले. तपासणीद्वारे सदर रस्त्यांचे बांधकाम योग्य की अयोग्य याचा उलगडा होणार असून त्यानंतरच रस्त्यांच्या खस्ता हालतीबाबतची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.
शहरातील रतनलाल प्लॉट ते टॉवर चौक, अग्रसेन चौक ते दुर्गा चौक, अशोक वाटिका ते मनपा बगीचा, नेहरू पार्क ते गोरक्षण हे रस्ते वर्षभरापूर्वीचे आहेत. काही रस्त्यांची कामे अजूनही सुरुच आहेत. मात्र वर्षभरातच काही रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे ठरले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पाहणी केली. सहा महिन्याचा कालावधीही लोटला नाही तोच अग्रसेन चौक ते दुर्गा चौक आणि रतनलाल प्लॉट ते टॉवर चौक या दोन्ही रस्त्यांची चाळण झाली असून त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. ही बाब निश्चितच गुणवत्तेला धरून नाही. त्यामुळे जबाबदार कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर कारवाई निश्चित करण्यासाठी मनपा आयुक्त व कार्यकारी अभियंत्यांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले होते.
तपासणीस स्वत:च देणार माहिती
शहरातील रस्त्यांच्या गुणवत्तेची तपासणी थेट गुण नियंत्रण विभागाकडून करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग आणि अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने ही तपासणी केली आहे. त्यासाठी उच्च गुणवत्तेच्या यंत्रांचा वापर करण्यात आला आहे. या यंत्राने एका अर्थाने रस्त्यांचे पोस्टमार्टमच केले आहे. दरम्यान ज्यांनी तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली, त्या यंत्रणेतील अधिकारी स्वत:च सोशल ऑडिटच्या अहवालाची मांडणी करणार आहेत. या दर्जा तपासणीचा अहवाल येत आहे.
अधिकारी स्वत:च मांडणी करतील
सोशल ऑडिटचा रिपोर्ट तयार करणारे अधिकारी स्वत:च त्यांच्या अहवालाची मांडणी करतील. जिल्हाधिकारी महोदयांचाच तसा मनोदय असून रस्ता बांधकामातील तांत्रिक बाबी व गुणवत्तेसंबंधीची मांडणी त्यांच्याच मुखी व्हावी, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
– संजय खडसे, नोडल अधिकारी तथा एसडीओ, वाळापूर.
अधिकाऱ्यांनी झटकले होते हात
बांधकामानंतर वर्षभराच्या आतच रस्त्यांची स्थिती वाईट झाल्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी महापालिकेचे आयुक्त जितेंद्र वाघ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहाण यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून खुलासा मागवला होता. परंतु क्युरेटिंग पिरियड संपायच्या आतच नागरिकांनी रस्त्यांचा उपयोग सुरु केला. त्यामुळे ते उखडले, असा युक्तिवाद करीत यंत्रणांनी हात झटकले होते.
अधिक वाचा : जिल्हयातील रस्त्यांची कामे गुणवत्तापुर्ण होणे आवश्यक – खासदार संजय धोत्रे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola