अकोला : खरीप हंगाम 2018-19 मध्ये राज्यात किमान आधारभूत किंमत योजनेतंर्गत नाफेडच्यावतीने मुग, उडीद व सोयाबीनची खरेदी पणन महासंघ, मुंबई व विदर्भ पणन महासंघ, नागपूर यांच्याकडून करण्यात येणार आहे. सदर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीची कार्यवाही दि. 25 सप्टेंबर 2018 पासून सुरु करण्यात आली आहे, तरी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन सहकार, पणन व वस्त्रोदयोग विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार यांनी केले आहे.
मुग, उडीद व सोयाबीनचे आधारभूत दर आणि नोंदणीचा कालावधी पुढीलप्रमाणे आहे. मुग-आधारभूत दर 6975/-, नोंदणी कालावधी दि. 25 सप्टेंबर 2018 ते 9 ऑक्टोबर 2018. उडीद – आधारभूत दर 5600/-, नोंदणी कालावधी दि. 25 सप्टेंबर 2018 ते 9 ऑक्टोबर 2018. सोयाबीन – आधारभूत दर 3399/-, नोंदणी कालावधी दि. 1 ऑक्टोबर 2018 ते 31 ऑक्टोबर 2018. सर्व खरेदी ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.
शेतकऱ्यांनी ज्या तालुक्यात त्यांची जमीन आहे, त्याच तालुक्यातील खरेदी केद्रांवर ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणीचा प्रारंभिक कालावधी 15 दिवसांचा असेल. तसेच अपवादात्मक प्रकरणी त्यानंतर आलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची नोंदणी खरेदी सुरु झाल्याच्या पहिल्या 15 दिवसांत करण्यात येईल. तदनंतर नोंदणी होणार नाही. नोंदणीकरीता आधार कार्डची प्रत व मुग/उडीद/सोयाबीन या पिकांची नोंद असलेला 7/12 उतारा सादर करावयाचा आहे. शेतकऱ्याचा कार्यरत असलेला मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर दयावयाचा आहे.
नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार माल आणण्यासाठी एसएमएस व्दारे कळविण्यात येईल. शेतकऱ्यांनी ज्या केंद्रावर नोंदणी केलेली आहे, त्याच केंद्रावर माल आणवयाचा आहे. एसएमएस शिवाय आणलेला माल परत पाठविण्यात येईल. शेतकऱ्यांनी एफएक्यु दर्जाचा माल म्हणजेच काडीकचरा नसलेला, चाळणी करुन व सुकवून 12 टक्के पेक्षा जास्त आद्रता नसलेला माल आणावा. तसा माल नसल्यास परत पाठविण्यात येईल.
खरेदी संस्था माल आणल्यानंतर पुढील बाबी तपासून त्याची होत असेल तरच खरेदी बाबत निर्णय घेईल—शेतकरी नोंदणीकृत आहे किंवा कसे ? एसएमएस दिल्यानंतर माल आणला किंवा कसे ? शासनाने निश्चित केलेल्या उत्पादकतेनुसार व खरेदीच्या मर्यादेनुसार माल आणला किंवा कसे ? 7/12 च्या पिकपेऱ्याची नोंद, खरेदी करावयाच्या पिकाची नोंद आहे किंवा कसे ? गुणवत्ता नियंत्रकाच्या मते माल एफएक्यु दर्जाचा आहे किंवा कसे ?
इलेक्ट्रॉनिक वजनकाटयावर मोजणी झाल्यानंतर मालाची नोंद वजनासह करुन काटापटटी शेतकऱ्यांना देण्यात येईल. खरेदी केलेल्या मालाची एनईएमएल पोर्टलवर त्याच दिवशी नोंद करण्याचे बंधन सबएजन्ट/खरेदी संस्थेवर राहील. शेतकऱ्यांना शेतमालाची रक्कम त्यांच्या आधार कार्डाशी संलग्न बँक खात्याव्दारेच देण्यात येईल, त्यामुळे आपले बँक खाते आधार कार्डाशी संलग्न असल्याची त्यांनी खात्री करावी. पोर्टलवर नोंदविलेल्या पिकाखालील क्षेत्राची 7/12 व स्थळ पाहणी करुन महसूल व कृषी विभागाकडून पडताळणी करण्यात येईल. तरी याचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा : भारिप बहुजन महासंघ अकोला जिल्हा कार्यकारिणी ची आढावा बैठक संपन्न.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola