दहिहांडा(शब्बीर खान): कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत राहणारे अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय वॉर्ड क्रमांक सहामध्ये बुधवारी रात्री सलाईनमधून इंजेक्शन दिल्याने त्याचा परिणाम होऊन एकजण दगावल्याच्या आणि सुमारे दहाजणांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आल्याच्या वृत्ताने पुन्हा एकवार चर्चेत आले. दरम्यान, रुग्ण दगावल्याचा येथील रुग्णांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आल्याचा कुठलाही प्रकार घडल्याच्या वृत्ताचा रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट शब्दात इन्कार केला असून, सलासईनमधून इंजेक्शन दिल्याने सहा ते सात रुग्णांना थंडी वाजून हुडहुडी भरली होती; मात्र त्यांच्यावर त्वरित आवश्यक ते उपचार करण्यात आल्याने काहीवेळातच त्यांना बरे वाटायला लागल्याची माहिती वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. रुग्ण दगावल्याची आणि रुग्णांना तातडीने अतिदक्षता विभागात हलविण्यात आल्याची चर्चा मात्र रुग्णालय प्रशासनासाठी डोकेदुखी ठरल्याचे चित्र पहावयास मिळाले.
या प्रकाराने घाबरलेल्या नातेवाईकांनी तर चार रुग्णांना खासगी रुग्णालयात हलविल्याचेही बोलले जाते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय परिसरात गुरुवारी या घटनेच्या चर्चेला उधाण आल्याने वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी ती चांगलीच डोकेदुखी ठरली. पश्चिम विदर्भातील रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय हे मोठा आधार आहे. वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातूनही येथे मोठ्यासंख्येने रूग्ण येतात; मात्र येथे सुविधांअभावी रुग्णांची हेळसांड होते ही बाब आता लपून राहिलेली नाही. डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना व्यवस्थित ‘ट्रिटमेंट’ मिळत नसल्याचा आरोप वारंवार नातेवाईकांकडून होतो. जवळपास पंधरा दिवसांपूर्वी एका रुग्णाचा चुकीच्या औषधोपचाराने मृत्यू झाल्याचा आरोप करुन नातेवाईकांनी रुग्णालयातच ठिय्या देत संबंधितावर कारवाईची मागणी केली होती. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण शांत झाले होते. आता बुधवारी रात्रीच्या घटनेने रुग्णांमध्ये घबराट निर्माण झाली असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी बोलून दाखविले. वार्ड ६ मध्ये बुधवारी रात्री सलाईनमधून इंजेक्शन दिल्याने काही रुग्णांना हुडहुडी भरली व त्यांना घाबरल्यासारखे झाले. नातेवाईकांनी संबंधित स्टाफ नर्ससोबत संपर्क साधून माहिती दिली. परंतु तिने उद्धटपणाची वागणूक दिल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. दरम्यान सध्या साथीचे रोग सुरू असल्याने अनेक रूग्णांना औषध, सलाईनमुळे अशा प्रकारची लक्षणे आढळत असल्याचे सर्वोपचारच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, हा प्रकार पाहून वार्डातील अन्य रुग्णांनी औषध घेण्यास नकार दिल्याची माहिती या रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली.
वॉर्ड क्रमांक ६ मध्ये व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, ताप, अंगदुखी या आजारांनी त्रस्त रुग्णांना भरती करण्यात आलेले आहे. बुधवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास रात्रपाळीला ड्युटीवर असणाफ्या स्टाफ नर्सने नेहमीप्रमाण या वॉर्डातील रुग्णांना औषधी आणि गोळ्यांचे वाटप केले. ज्यांना आवश्यकता होती अशा रुग्णांना सलाईन लावून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यापैकीच काही रुग्णांना सलाईनमधून इंजेक्शन दिल्याने त्यांना मळमळ होऊ लालगली, सोबतच मोठ्या प्रमाणावर थंडी वाजून हुडहुडी भरली. असा प्रकार एक – दोन नव्हे तर तब्बल सहा ते सात रुग्णांसोबत एकाचवेळी घडल्याने वॉर्डात खळबळ उडाली. काहीजणांना अस्वस्थ वाटू लागले. हा प्रकार पाहून इतरही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना धडकी भरली; मात्र कर्तव्यावर असणाऱ्या स्टाफ नर्स आणि डॉक्टरांनी वेळीच धाव घेऊन त्या रुग्णांवर त्वरित प्रतिबंधात्मक उपचार केल्याने त्यांना काहीवेळातच बरे वाटायला लागले. परंतु या घटनेत एकजण दगावल्याच्या आणि काहीजणांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आल्याच्या चर्चेला गुरुवारी दिवसभर उधाण आले होते. यासंदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना उत्तरे आणि स्पष्टीकरण देता-देता रुग्णालय प्रशासनाच्या मात्र नाकी नऊ आले! शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अगोदरच औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना ही औषधे बाहेरुन आणावी लागत आहेत. त्यातच वेळेवर आणि व्यवस्थित उपचार मिळत नसल्याने रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. अशातच बुधवारी रात्रीच्या सुमारास वार्ड क्रमांक सहामध्ये स्टाफ नर्सने काही रुग्णांना सलाईनद्वारे इंजेक्शन दिल्यावर या रुग्णांना अस्वस्थता जाणवू लागली. सूत्रांच्या माहितीनुसार, यातील एक रुग्ण दगावला तर काहींना अतिदक्षता विभागात हलविण्यात आल.
सलाईनद्वारे इंजेक्शन दिल्याने रुग्णाला थंडी वाजणे सहाजिक आहे. परिसरात सुरू असलेल्या चर्चेत तथ्य नसून, असा कोणताही प्रकार घडला नाही. रुग्णांना कुठल्याच प्रकारचे चुकीचे औषध किंवा इंजेक्शन दिले गेले नाहीत. – डॉ.कुसुमाकर घोरपडे (प्रभारी अधिष्ठाता , शासकीय वैदकिय महाविद्यालय ,अकोला)
६ नंबरच्या वार्डातील ४ पेशंट आयडेंटीफाय करण्यात आले आहेत. त्यांना कशामुळे रिअॅक्शन झाली याची तपासणी करण्यात येणार आहे. रूग्णांची तपासणी केल्यानंतर नेमके कारण उघडकीस येईल. याचा रिपोर्ट वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार आहे. -डॉ.मुकुंद अष्टपुत्रे (वार्ड इंचार्ज)
अधिक वाचा : शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी २ ऑक्टोबर पासून अकोला जिल्हा दाैऱ्यावर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola