अकोला: शहरातील गणेश विसर्जन मार्गाची रविवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पाहणी केली. विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीबरोबरच मार्गातील अडथळे दूर करावेत. मार्गातील वीज वाहिन्या, केबलच्या तारा, टेलीफोनचे वायर याबाबत तातडीने कार्यवाई करावी. असे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दि. 23 सप्टेंबर 2018 रोजी श्री मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. विसर्जन निर्विघ्नपणे व सुरळीत पार पडावे याकरीता जिल्हाधिकाऱ्यांनी सिटी कोतवालीपासून विसर्जन मार्गाची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गिरीश जोशी, कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान, महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, तहसिलदार विजय लोखंडे, जिल्हयातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, सचिव सिध्दार्थ शर्मा, आदीसह महावितरण, बीएसएनएलचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली चौक, जयहिंद चौक, दगडी पूल रोड, अगरवेस, मामा बेकरी, टिळक रोड, अकोट स्टँड, सुभाष चौक, मोठी मशीद, जैन मंदिर रोड, गांधी चौक, सिटी कोतवाली असे मार्गक्रमण करीत विसर्जन स्थळ असलेल्या गणेश घाटाची पाहणी केली. 23 सप्टेंबर पूर्वी रस्त्यातील खडडे बुजविण्याबरोबरच नाल्याची दुरुस्ती, केबल व टेलीफोनचे वायर हटविण्याची सूचना त्यांनी केली. कुठल्याही प्रकारे विसर्जन मिरवणुकीस अडथळा निर्माण होता कामा नये. कायदा व सुव्यवस्थेसाठी मिरवणुक काळात कडक पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी सूचनाही त्यांनी केली. गणेश घाटावर व्यवस्थितपणे विसर्जन करता यावे, या करीता महानगर पालिकेने आवश्यक ती कार्यवाही करावी. पर्यावरणाच्या रक्षणासाठी तसेच भाविकांच्या सुविधेसाठी प्रत्येक प्रभागात गणेश विसर्जनकरीता तात्पुरत्या स्वरुपाचे पाण्याचे छोटेसे टँक ठेवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मनपा अधिकाऱ्यांना केली.
अधिक वाचा : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत जनतेच्या समस्या निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola