शेगाव – विदर्भाची पंढरी संत नगरी शेगावात शुक्रवारी रोजी श्रींचा १०८ वा पुण्यतिथी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी व भक्ती भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी राज्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या पाचशेच्या वर भजनी दिंड्यासह लाखो भाविकांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. ‘गण गण गणात बोते!’, ‘जय गजानन श्री गजानन’च्या नामघोषाने संत नगरीत भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
श्री गजानन महाराज संस्थानमध्ये श्रींचा १०८ वा पुण्यतिथी उत्सवाला १० सप्टेंबर पासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन इत्यादींसह गणेश याग व वरुण यागास आरंभ करण्यात आला होता. यागाची पुर्णाहुती आज सकाळी १० वाजता संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांचे हस्ते व संस्थानचे अध्यक्ष नारायणराव पाटील, विश्वस्त आर.सी. डांगरा, गोविंदराव कलोरे, विश्वेश्वर त्रिकाळ, प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. पुण्यतिथी उत्सवानिमित्त सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत हभप श्रीरामबुवा ठाकूर परभणी यांचे कीर्तन झाले. दुपारी २ वाजता श्रींची पालखी गज, अश्व, रथ, मेणा इत्यादीसह राजवैभवी थाटात नगरपरिक्रमेकरिता निघाली होती. प्रथम श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांचे हस्ते करण्यात येवून पालखी मंदिरातून नगरपरिक्रमेकरिता मार्गस्थ झाली. पालखी गजानन चित्र मंदिराजवळून जुने महादेव मंदिर, शितलनाथ महाराज मंदिर माळीपुरा व श्रींच्या प्रगटस्थळी विश्वस्तांच्या हस्ते पूजा करुन गढी जवळून भैरव चौक, आठवडी बाजार, बसस्थानक, अग्रसेन चौक, शिवाजी चौक, गांधी चौक या मार्गाने जाऊन पालखी संध्याकाळी ६ वाजता मंदिरात पोहचली. यावेळी संस्थानच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत महाआरती होऊन या पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली.
शनिवारी १५ सप्टेंबर रोजी हभप प्रमोदबुवा राहणे पळशी यांचे सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन व दहीहंडी होऊन या महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. श्रींच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने श्रींच्या मंदिरावर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या उत्सवात सहभागी भजनी दिंड्यांना भजनी साहित्य (टाळ, विणा, मृदंग) व संत वाङमयाचे वितरण करण्यात आले. उत्सवात सहभागी भजनी दिंड्या व भाविक भक्तांना संस्थानचे वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या उत्सवात संत नगरीत भजनी दिंड्यासह लाखो भाविक भक्त सहभागी झाले होते. पोलीस प्रशासनातर्पे चोख बंदोबस्त लावून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दखल घेण्यात आली होती.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola