जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या पी.व्ही. सिंधूचा पराभव झाला आहे. राऊण्ड ऑफ १६ मध्ये चीनच्या फॅँगजे गाओविरुद्ध खेळताना सिंधूचा १८-२१, १९-२१ च्या सरळ सेटमध्ये पराभव झाला. या पराभवामुळे सिंधूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या फेरीपासूनच सिंधू संघर्ष करताना दिसली. तिने पहिल्या सामन्यात विजय मिळवत राऊण्ड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला होता तरी त्या विजयासाठी तिला तीन सेटचा सामना खेळत संघर्ष करावा लागला होता. जपानच्या सायाका ताकाहाशीविरुद्ध सिंधूने पहिला सामना २१-१७, ७-२१, २१-१३ असा जिंकला होता. मात्र आजच्या सामन्यामध्ये फॅँगजेसमोर सिंधूचा निभाव लागला नाही. आधीच्या फेरीमध्येही फॅँगजेने भारताच्या जक्का वैष्णवी रेड्डीला २१-१०, २१-८ असे पराभूत करीत दुसरी फेरी गाठली होती.
सिंधू स्पर्धेबाहेर गेली असली तरी भारताचे किदाम्बी श्रीकांत आणि एच.एस. प्रणॉय यांचे राऊण्ड ऑफ १६ मधील सामन्यांकडे भारतीय चाहत्यांची नजर लागून राहिली आहे. या तिन्ही प्रमुख खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पध्र्यावर मात करीत दुसऱ्या फेरीत धडक मारली होती. प्रणॉयने आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टीवर २१-१८, २१-१७ अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली होती, तर श्रीकांतने त्याचा चिनी प्रतिस्पर्धी युझिआंग हुआंगवर २१-१३, २१-१५ अशा दोन सेटमध्ये विजय मिळवला. प्रणॉयची आजची लढत इंडोनेशियाच्याच अॅन्थोनी सिनीसुकाशी, तर श्रीकांतची लढत हॉँगकॉँगच्या विन्सेंट वोंग विंग की याच्याशी होणार आहे.
राष्ट्रकुल स्पर्धा, जागतिक बॅडमिंटन स्पर्धा आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सिंधूला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले होते. जपान ओपनमधील सिंधूचा हा पराभव तिच्या चाहत्यांना पचवणे थोडे कठीण जाईल.
अधिक वाचा : अजिंक्य रहाणे कडे मुंबई संघाचे नेतृत्व