दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी कदम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी याचिकेत केली असून, या याचिकेवर 21 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुणे जिल्हा अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ही याचिका केली आहे. दहीहंडी सोहळ्यात स्टेजवरून कदम यांनी, “कोणत्याही कामासाठी मला भेटू शकता. साहेब, मी तिला प्रपोज केले आहे. पण, ती मला नकार देत आहे. साहेब मदत करा… मी शंभर टक्के मदत करणार. आधी मी तुम्हाला तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायला सांगेन. जर आई-वडिलांनी होकार दिला आणि मुलगी पसंत आहे, असे सांगितले तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार! त्या मुलीला पळवून आणण्यासाठी तुम्हाला मदत करणार! त्यासाठी माझा मोबाईल नंबर घ्या आणि मला फोन करा…’ असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचे प्रसारण सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून झाले. वर्तमानपत्रातही बातम्या आल्या.
चोहोबाजूंनी कदम यांच्यावर टीकेची झोड उठल्यावर, “समस्त माता-भगिनींचा आदर करत माफी मागत आहे’, असे कदम यांनी जाहीर केले होते. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा करीत त्यांनी हा माफीनामा सादर केला होता; परंतु त्यांचा हा माफीनामा महिला म्हणून स्वीकारण्यायोग्य वाटत नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. ज्या पद्धतीने त्यांनी महिलांप्रती अपशब्द काढले तितक्या पोटतिडकीने हा माफीनामा दिला नसल्याचे चाकणकर यांचे म्हणणे आहे.
महिला आयोगाने मागितला खुलासा
राम कदम यांच्या महिलांविषयक वादग्रस्त वक्तव्याची दखल महिला आयोगाने स्वाधिकारे (सू मोटो) घेतली आहे. महिलांप्रती जबाबदारीने वक्तव्य करणे गरजेचे असून, येत्या आठ दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिले आहेत.
अधिक वाचा : एनआरसीमध्ये नोंद नसलेल्यांना देशातून हाकलणार : भाजपचे महासचिव राम माधव