अकोला – अकोला जिल्हयातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि ग्राहकांच्या हिताकरीता जिल्हा प्रशासनाचा ‘वावर’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम अकोलेकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. ॲप, वेबसाईट या सारख्या अत्याधुनिक तंत्राची जोड देऊन अत्यंत गुणवत्तापूर्ण शेतकऱ्यांचा ताजा शेतमाल थेट ग्राहकांना स्वस्त दरात ‘वावर’ च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. ‘वावर’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवन बदलणार आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी व्यक्त केला.
वावरच्या यशस्वितेसाठी स्वत: जिल्हाधिकारी यांनी आज शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा केली. या उपक्रमाला पसंती दर्शवत उपस्थित अनेक शेतकऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.नियोजन भवनात आज ‘वावर’ संदर्भात बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपवनसंरक्षक एस.बी. वळवी, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, सामाजिक वनीकरणाचे विभागीय वन अधिकारी विजय माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, तहसिलदार आदींसह मोठया प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देऊन शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘वावर’ चा उपक्रम हाती घेतला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्हयातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय शेतकरी ते ग्राहक या तत्त्वानुसार ग्राहकांपर्यंत पोहोचविल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे, यासाठी ‘वावर’ नावाने सहकारी संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे. प्राथमिक स्तरावर ‘वावर’ च्या संदर्भातील कामकाज पूर्णत्वास गेले आहे. लवकरच सर्व बाबींची पूर्तता करुन ‘वावर’ क्रियान्वीत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी ‘वावर’ ही फार मोठी संधी राहणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी या उपक्रमात सहभागी शेतकऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. ‘वावर’च्या यशस्वितेसाठी तुमचे सर्वांचे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, वेबसाईट, मोबाईल ॲप, कॉल सेंटर अशा आधुनिक तंत्राची ‘वावर’ ला जोड देण्यात आली आहे. याबरोबरीने मालाची ने-आण करण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत माल पोहोचविण्यासाठी तरुण होतकरु 500 शेतकऱ्यांना ई-कार्ट देण्याबरोबरच त्यांना मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच ॲग्रो मॉल, कोल्ड स्टोरेज या सुविधादेखील उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे ‘वावर’ या नावाखाली शेतमालाच्या प्रत्येक वस्तुंचे ब्रॅण्डींग आणि मार्केटिंग जिल्हा प्रशासन करणार आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून ‘वावर’ निश्चितपणे यशस्वी ठरणार आहे. ‘वावर’ च्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ‘वावर’ च्या उपक्रमासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली जाणार आहे. या उपक्रमात सहभागासाठी शेतकऱ्यांनी करार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रारंभी प्रास्ताविकात श्री. खवले यांनी ‘वावर’ बाबत सविस्तर माहिती दिली. संगणकतज्ञ महेश नाफडे यांनी ‘वावर’ वेबसाईट व ॲपबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. यावेळी ‘वावर’बाबत शेतकऱ्यांच्या सूचना जाणून घेण्यात आल्या. अकोला जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी ‘वावर’ हे मोठे क्रांतीकारी पाऊल आहे. या माध्यमातून शेतकरी निश्चितपणे सुखी होईल. या उपक्रमाच्या यशासाठी आम्ही शेतकरी तुमच्या पाठीशी आहोत, असा ठाम विश्वास शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
अधिक वाचा : भारिप जिल्हाध्यक्ष पदी प्रदीप वानखडे यांची वर्णी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola