पातूर (सुनील गाडगे ) : पातूर तालुक्यातील एका हवालदिल शेतकऱ्याने कपाशीवर बोंडअळी झाल्याने अडीच एकरातील कपाशी अक्षरश: उपटून फेकल्याची घटना घडली आहे. शेख सुलेमान शेख ईसा, रा. अंबाशी, ता. पातूर असे या शेतकऱ्याचे नाव असून, जादू बिनधास्त कंपनीने बोगस बियाणे देवुन आपली फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पातूर तालुक्यातील अंबाशी येथील शेख सुलेमान शेख ईसा या अल्पभूधारक शेतकऱ्याकडे एकुण साडेतीन एकर शेती आहे. किमान यावर्षी तरी चांगले उत्पन्न मिळेल या आशेने त्याने आपल्या अडीच एकर शेतात कपाशी लावली. त्यासाठी जादू बिनधास्त या कंपनीचे बियाणे त्याने खरेदी केले; मात्र पीक जोमावर येण्यापूर्वीच त्यावर मोठ्या प्रमाणात बोंडअळी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बियाणे घेताना हे उत्तम दर्जाचे बियाणे असून, कपाशीच्या पिकावर बोंडअळी होणार नाही, असे या शेतकऱ्याला सांगण्यात आले होते; मात्र आता जादू बिनधास्त कंपनीचे हे बियाणे बोगस निघाल्याने कपाशीवर बोंडअळी झाली आहे. त्यामुळे सदर कंपनीने आपली फसवणूक केल्याचा आरोप शेख सुलेमान शेख ईसा या शेतकऱ्याने केला असून, कंपनीने आपल्याला याबदल्यात नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी त्याने केली आहे. बोंडअळी झाल्याने त्याने आपल्या अडीच एकरातील सर्व कपाशी अक्षरश: उपटून फेकली आहे. शासनाकडून मोठा गाजावाजा करीत शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणा केलया जातात; मात्र त्यांच्यापर्यंत मदत पोहोचत नाही. कर्जबाजारीपणा आणि नापिकी यामुळे अगोदरच शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशातच आता कंपन्यांकडून बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे. आता आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा अशी चिंता या शेतकऱ्याला सतावत आहे. संबंधित कंपनीने आणि शासनाने आपल्याला मदत करावी, अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.
हेही वाचा : बेकायदा कीटकनाशक विक्री; तीन कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल; कृषि विभागाच्या तक्रारीनंतर झाले गुन्हे दाखल
कामगंध सापळेही ठरताहेत बोगस!
दरम्यान, कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘कामगंध सापळे’ हा एकमेव पर्याय असल्याचे समजून अनेक शेतकरयांनी त्याची खरेदी केली; मात्र हे सापळेही कुचकामी ठरत आहेत. खासगी वितरकांकडून हे सापळे खरेदी केली जात आहेत; पण अनेक ठिकाणी बोंडअळीचे पतंग सापळ्यात अडकत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी ‘कामगंध सापळे’ (फेरोमेन ट्रॅप) प्रभावी ठरत असल्याचे सांगत कपाशीच्या शेतात ’कामगंध सापळे’ लावण्यावर भर देण्यात आला, त्यामुळे या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी कामगंध सापळे लावण्यास सुरुवात केली. बाजारात ३० ते ३५ रुपयाला एक सापळा विकण्यात येत आहे. या सापळ्यात बोंडअळीच्या ‘नर’ पतंगाला आकर्षित करण्यात येणारे रसायन वापरण्यात येते; पण अनेक शेतकऱ्याच्या शेतावर लावलेल्या कामगंध सापळ्यात पतंग अडकलेच नसल्याने चित्र आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola