अकोला – जिल्हयात सध्या अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत, ही कामे गुणवत्तापुर्ण होणे आवश्यक आहे, यासाठी संबंधित विभागाने जबाबदारीने आणि समन्वयाने कामे करावीत. रस्त्यांच्याबाबतीत तक्रार येता कामा नये. रस्त्यांच्या कामांचा अनुपालन अहवाल येत्या पंधरा दिवसांत प्रशासनाकडे सादर करावा. रस्त्यांच्या कामात दिरंगाई झाल्यास संबंधित यंत्रणेला दोषी ठरवून त्यांच्यावर कार्यवाई करण्यात येईल, अशी सूचना महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे यांनी दिली.
जिल्हयात राष्ट्रीय महामार्ग तसेच अकोला शहर व जिल्हयात विविध ठिकाणी सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत लोकशाही सभागृहात आढावा बैठक झाली. यावेळी महापौर विजय अग्रवाल, आमदार सर्वश्री प्रकाश भारसाकळे, गोवर्धन शर्मा, गोपीकिशन बाजोरिया, रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गिरीश जोशी, कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान, महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, राष्ट्रीय महामार्गाचे व्यवस्थापक विलास ब्राम्हणकर, प्रकल्प संचालक राकेश जवादे, कार्यकारी अभियंता श्री. झाल्टे, शहर अभियंता इकबाल खान, जिल्हा खणीकर्म अधिकारी अतुल दौड, आदींसह मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी, उपस्थित होते.
अकोला जिल्हयात रस्त्यांच्या कामांसाठी मोठया प्रमाणात निधी आला आहे, असे प्रारंभी सांगून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, या निधीतून अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. गुणवत्तापूर्ण रस्ते तयार करण्याबाबत वेळोवेळी संबधीत विभागांना निर्देश देण्यात आले होते. या विभागांनी संबंधीत कंत्राटदारांवर तातडीने कारवाई करावी. तसेच रस्ते दर्जेदार बनविण्याबाबत दक्षता घ्यावी. रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यास संबंधित कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्यात येईल. तसेच संबंधीत अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल.
बैठकीत अकोला शहरातील नेकलेस रोड, गौरक्षण रोड आदींसह, महत्त्वाचा कावड यात्रा मार्ग असणारा गांधीग्राम ते अकोला रोडच्या कामांबाबत प्राधान्याने चर्चा झाली. या मार्गावरील कामांच्याबाबत बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नेकलेस रोडच्या रुंदीकरणाचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित राहिल्याने मान्यवरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. या रस्त्यांवरील विजेचे खांब अदयाप का हटवले गेले नाहीत, निविदा झाली असताना रस्त्याच्या कामाला सुरुवात का करण्यात आली नाही, गौरक्षण रोडचे काम अदयाप पूर्ण का करण्यात आले नाही, कावड यात्रा मार्गाचे काम पूर्ण का करण्यात आले नाही, अशी विचारणा मान्यवरांनी केली.
रस्त्यांची प्रलंबित कामे, निकृष्ट दर्जाचे रस्ते याबाबत नाराजी व्यक्त करुन खासदार संजय धोत्रे म्हणाले की, रस्त्यासांठी जागा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत निविदा प्रक्रीया करु नका, रस्त्यांची कामे ही गुणवत्तापूर्णच झाली पाहिजेत. नेकलेस रोडवरील विजेचे खांब हटवण्याचे काम तातडीने पूर्ण करुन कामाला सुरुवात करावी. तसेच गौरक्षण रस्त्याचे कामही तात्काळ पूर्ण करण्यात यावे. यात्रेकरुंसाठी कावड मार्ग सुलभ करण्यासाठी जो चांगला पर्याय आहे, त्यानुसार मार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करावे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांची कामेही दर्जेदारच झाली पाहिजेत. झालेल्या रस्त्यांच्या कामांबाबत कंत्राटदारांचे नाव, कामाचे स्वरुप, झालेला खर्च आणि रस्त्याचा टिकाव कालावधी नमूद असणारे फलक संबंधीत रस्त्याच्या बाजूला लावावेत, शहरातील गर्दीच्या प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी केल्या.
आमदार प्रकाश भारसाकळे यांनी अकोट-अकोला राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत यावेळी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, वर्दळीचा असणाऱ्या या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. रस्ता दोन्ही बाजुने खोदला असल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे.
पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर म्हणाले की, कावड यात्रा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून कावड मार्गावरुन यात्रेकरुन सुलभपणे जाण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. मुख्य कावड यात्रेच्या दिवशी वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola