भारताच्या 72व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लाल किल्लावरून पाचव्यांदा भाषण करताना देशातील गरिबात गरीब व्यक्तीला आरोग्य सुविधा मिळावी यासाठी ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ सुरू करण्याची घोषणा केली.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत देशातील 10 कोटी कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. पंडित दीनदयाळ यांच्या जयंतीनिमित्त 25 सप्टेंबरपासून प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सुरूवात केली जाणार आहे. सदर योजनेमुळे यापुढे देशातील कोणतेही गरीब कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही, असे मोदी यांनी सांगितले.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. या योजनेअंतरर्गत 50 कोटी लोकांना आरोग्य विमा देण्याचा प्रस्ताव आहे. गरीब आणि ग्रामीण भागातील जनेतेला चांगली आरोग्य सुविधा मिळावी हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेची महत्त्वाची बाब म्हणजे कुटुंबांतील सदस्य संख्येबाबत कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. या योजनेअंतर्गत सामान्य जनतेला केवळ आर्थिक निकषांच्या आधारावर लाभ दिला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत रुग्णांना त्यांच्या सुविधेनुसार सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचाराची सुविधा पुरवली जाणार आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णाला आधारकार्डची सक्ती असणार नाही. मोदी यांच्या कॅशलेस इंडियाच्या दृष्टीने या योजनेला पूर्णपणे कॅशलेस ठेवण्यात आले आहे. या योजनेचे प्रीमियम राज्य आणि केंद्र सरकारतर्फे भरले जाणार आहेत.
प्रीमियमची 40 टक्के रक्कम राज्य आणि 60 टक्के रक्कम केंद्र सरकारकडून भरली जाईल. या योजनेअंतर्गत हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी लाभार्थ्याला ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळणार आहे. या योजनेच्या योग्य अंमलबजावणीसाठी देशभर जवळपास दीड लाख आरोग्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या योजनेमुळे गरिबांना चांगले आणि स्वस्तात उपचार मिळू शकतील. मोठ्या संख्येने रुग्णालये उभारण्यात येणार असल्यामुळे अनेकांना रोजगारही मिळेल असे ते म्हणाले.
मोदी यांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर अधिक भर दिला.
जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही संस्थांना आणखी मजबूत करण्यासाठी पंचायत आणि पालिका निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही जम्मू-काश्मीरला ‘इन्सानियत, काश्मिरियत, जम्हूरियत’ असे संबोधले होते. माझेही हेच म्हणणे आहे की, प्रत्येक समस्येचे निराकरण गळाभेटीनेच होऊ शकते. आमचे सरकार जम्मू-काश्मीरमधील सर्व क्षेत्रे आणि सर्व वर्गांचा विकास करण्यास कटिबद्ध आहे.
13 कोटी युवकांनी ‘मुद्रा योजने’चा लाभ घेतला आणि त्यांनी स्वयंरोजगार सुरू केला. डिजिटल इंडियाचा विस्तार गावांमध्येही होत आहे. तीन लाखांहून अधिक सेवा केंद्रे देशभरातील गावांमध्ये सुरू आहेत. आपला देश वेगाने पुढे जात आहे. 2022 पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. अनेक नव्या पिकांचे विक्रमी उत्पादन होत आहे, असेही ते म्हणाले.
अधिक वाचा : स्वातंत्र्य दिवसानिमित्त Google ने Doodle करून नागरिकांना दिल्या शुभेच्छा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola