चेन्नई – द्रविड मुन्नेत्र कळघमचे (द्रमुक) नेते आणि तामिळनाडूचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले ‘कलैगनार’ (कलानिपूण, कलांचा विद्वान) तथा मुथुवेल करुणानिधी यांचे मंगळवारी संध्याकाळी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. प्रदीर्घ काळापासून आजारी असलेल्या करुणानिधी यांनी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात संध्याकाळी ६.१० मिनिटांनी अंतिम श्वास घेतला.
रुग्णालयाचे कार्यकारी संचालक अरविंदन सेल्वराज यांनी पत्रक काढून करुणानिधी यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, डॉक्टर आणि नर्सेसच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. करुणानिधी यांना त्यांच्या गोपालपुरम येथील निवासस्थानी कमी रक्तदाबाच्या त्रासानंतर २८ जुलैला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयूत उपचारांनंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यांच्यावर बुधवारी चेन्नईतील मरीना बीचवर अंत्यसंस्कार केले जातील.
तामिळनाडूत राज्य सरकारने सात दिवसांच्या दुखवट्याची घोषणा केली आहे. बुधवारी सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. द्रविड नेत्याच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह इतर नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. मोदी आणि राहुल गांधी बुधवारी त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होतील. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळीच चेन्नईकडे रवाना झाल्या.
चित्रपटांतून राजकारणात प्रवेश
३ जून १९२४ ला ब्रिटिश भारताच्या मद्रास प्रेसिडेन्सीच्या नागिपट्टणमच्या तिरुक्कुवलई गावात करुणानिधी यांचा जन्म झाला. करुणानिधी यांनी तामिळ चित्रपटांत पटकथा लेखक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. नंतर सक्रिय राजकारणात उतरून त्यांनी दलितांच्या हक्कांचा लढा बुलंद केला.
– १९५७ मध्ये ते पहिल्या वेळेस तामिळनाडू विधानसभेत आमदार बनले.
– १९६७ मध्ये ते पहिल्यांदा सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले.
– १९६९ मध्ये अण्णादुराई यांच्या निधनानंतर ते प्रथमच तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले.
– ५ वेळा ते तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी राहिले. आपल्या आयुष्यात १३ विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले. ते सदैव अपराजित राहिले. करुणानिधींचे समर्थक त्यांना थलैवा (नेता), कलैगनार (कलानिपूण, कलांचा विद्वान) संबोधत.
१४ व्या वर्षी हिंदीविरोधी आंदोलनात सहभागी
करुणानिधी हे वयाच्या १४ व्या वर्षी १९३९ मध्ये आपल्या तिरुवरूर शहरात हिंदीविरोधी आंदोलनात सहभागी झाले. ते द्रविड आंदोलनाचे धुरीण बनले होते. ते समाजवादी व बुद्धिवादी आदर्शांना चालना देणाऱ्या ऐतिहासिक व सामाजिक सुधारणावादी कथा लिहिण्यासाठी प्रख्यात होते.
करूणानिधींच्या निधनाने अतीव दु:ख- पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरून करूणानिधी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्याला करूणानिधी यांना भेटण्याची अनेकदा संधी मिळाली. सामाजिक कल्याण आणि त्यासाठी राबवाव्या लागणा-या धोरणांबाबत त्यांची समज अतिशय चांगली होती. करूणानिधी यांच्या रूपाने आपण एक मासलीडर, समाजासाठी झटणारा विचारवंत, एक लेखक गमावला. तामिळनाडू त्यांना कधीही विसरणार नाही, असे मोदींनी म्हटले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola