अकोला– शहरातील रस्त्यांची बकाल अवस्था व सुरू असलेली कामे लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी मंगळवार, ३१ जुलैला सकाळी ११ वाजता सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठिय्या आंदोलन केले. खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी आदेश दिल्यावर महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून तीन तासात प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागास भाग पाडून येत्या सहा दिवसात १२ रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे अभिवचन या वेळी घेण्यात आले.
कावड पालखी मार्ग, अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन, स्टेशन ते गुरुद्वारा, अशोक वाटिका ते कौलखेड, अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय, जुना कापड बाजार ते शिवाजी पार्क, नेहरू पार्क ते बिर्ला कॉलनी तापडिया नगर, सिंधी कॅम्प ते शिवापूर, भांडपुरा पोलिस चौकी ते डाबकी रोड, राम नगर परिसरातील रस्ते तसेच शेगाव बायपास रेल्वे गेट उड्डाण पूल तसेच प्रभाग ५ मधील माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या घरासमोरील रस्ता, गोरक्षण रोड मार्गावरील रस्त्याबाबत भाजप कार्यकर्त्यांनी अनेक तक्रारी व कामाच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केले. अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन या रस्त्यावर चुरीमुळे धुळीच्या कणांमुळे होणाऱ्या आजाराचा प्रश्न अधिकाऱ्यांपुढे मांडला.
कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, गिरीश जोशी अजय शर्मा, हरिभाऊ काळे, प्रशांत अवचार, विजय इंगळे, सतीश ढगे, राहुल देशमुख, सुनील क्षीरसागर, सुभाष खंडारे, तुषार भिरड, प्रकाश घोगलिया, मनोज पाटील, श्याम विंचनकर, मुन्ना घाटे, शिवम शर्मा आदी कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात मंगळवारी सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान यांच्या कार्यालयात ठिया आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेक प्रश्नांची सरबत्ती केल्यावर येत्या ६ दिवसात सर्व कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली. घटनास्थळांना भेट देऊन अभियंता पटोकार, गव्हाळे, देशमुख यांनासुद्धा निर्देश देण्यात आले. खा. धोत्रे, आ. शर्मा यांच्या निर्देशानंतर व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या अभिवचनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या अांदाेलनात भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा : तीन हजारांंची लाच घेताना पुरवठा निरीक्षकास पकडले