अकोला, दि. 27 — शिवभक्तांसाठी महत्त्वाची असणारी कावड यात्रा 13 ऑगस्ट 2018 पासून सुरु होत आहे, ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी कावड यात्रा मार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे दि. 4 ऑगस्ट पूर्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी संबंधितांना दिले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात आज कावड यात्रेबाबत बैठक झाली. यावेळी महापौर विजय अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान व राष्ट्रीय महामार्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दि. 12 ऑगस्ट पासून श्रावण महिन्यास सुरुवात होणार आहे. या महिन्यात येणाऱ्या दर सोमवारी मोठया प्रमाणात जिल्हयातील शिवभक्त कावड पालखीव्दारे गांधीग्राम येथून पुर्णा नदीचे पाणी घेवुन येतात व अकोला शहरातील श्री राजराजेश्वर मंदिर येथे जलाभिषेक करतात. सदर मार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरु आहे. तर शहरातील मार्गावर अनेक ठिकाणी दुरस्तीची कामे सुरु आहेत.
जिल्हाधिकारी म्हणाले की, कावड यात्रेदरम्यान गांधीग्राम ते श्री राजराजेश्वर मंदिरापर्यंत शिवभक्तांना त्रास होऊ नये म्हणून रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. या मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मनपा यांच्या अख्यात्यारातील रस्ता दुरुस्तीची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. खडडे पडलेले असतील तर ते बूजुन घ्यावेत. दि. 4 ऑगस्टपर्यंत ही कामे पूर्ण करण्यात यावीत. या दिवशी आपण स्वत: तसेच महापौर, मनपा आयुक्त दुरुस्त करण्यात आलेल्या कामांची पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
***