प्राप्तिकर विभागाने नागरिकांना दिलासा देत प्राप्तीकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2018 केली आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठीचे (2017-18) प्राप्तिकर विवरणपत्र ( इन्कम टॅक्स रिटर्न ) भरण्यासाठी आता जेमतेम 4-5 दिवस बाकी राहिले असताना सरकारने हा दिलासा दिला आहे.
The last date for submission of income tax has been extended from 31st July to 31st August 2018, I request every taxpayer to submit their income tax by the due date, fulfil their duty as a law-abiding citizen and contribute in the nation building.https://t.co/f775e9sfsy
— Piyush Goyal (@PiyushGoyal) July 26, 2018
गेल्या आर्थिक वर्षासाठीचे (2017-18) किंवा 2018-19 या असेसमेंट वर्षासाठी प्राप्तिकर विवरण पत्र ( इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग) भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2018 होती. त्यामुळे विवरण पत्र वेळेत भरण्यासाठी सर्वसामान्य करदात्यांची लगबग सुरू झाली होती. मात्र सर्वसामान्यांना दिलासा देत प्राप्तिकर विभागाने या मुदतीत वाढ करत ती 31 ऑगस्ट 2018 अशी केली आहे.
इन्कम टॅक्स अॅक्ट, 1961 च्या कलम 119 अंतर्गत प्राप्तिकर विभागाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न भरताना…
यंदा झालेले बदल लक्षात घेऊन योग्य त्या फॉर्मची निवड करणे; तसेच ती भरताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा करदात्याला विविध समस्यांना सामोरे जावे लागेल. हे बदल; तसेच योग्य विवरणपत्राची निवड आणि ते भरताना घ्यावयाची काळजी, या विषयी थोडक्यात मार्गदर्शन या लेखाद्वारे केलेले आहे.
1) विवरणपत्राच्या योग्य त्या फॉर्मची निवड ः व्यक्ती, संस्था, कंपनी आणि भरायचा फॉर्म याचा तक्ता सोबत दिला आहे.
2) चुकीचा फॉर्म भरला गेला तर विवरणपत्र सदोष मानण्यात येते.
3) या वर्षी दिलेल्या वेळेत विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास कमीत कमी रु. 1000 इतका दंड वसूल केला जातो. हा दंड विवरणपत्र भरण्याच्या आधीच सरकार दप्तरी जमा करावा लागतो. हा दंड कलम 234 ए या कलमाखाली प्राप्तिकर विवरणपत्र उशिरा भरले तर लागू होणाऱ्या व्याजांव्यतिरिक्त असेल. या दंडाची रक्कम करदात्याचे उत्पन्न व विवरणपत्र भरण्यास किती उशीर झाला आहे, यावर ठरते. याचा तपशील पुढीलप्रमाणे-
अ) करदात्याचे करपात्र उत्पन्न जर रु. 5 लाखांपेक्षा जास्त असेल आणि –
- जर विवरणपत्र 31 जुलैनंतर; पण डिसेंबर 2018 च्या आधी भरले तर दंडाची रक्कम रु. 5000,
- जर विवरणपत्र डिसेंबर 2018च्या नंतर भरले तर दंडाची रक्कम रु. 10,000,
ब) करदात्याचे करपात्र उत्पन्न जर रु. 5 लाखांपेक्षा कमी असेल तर दंडाची रक्कम रु. 1000. विवरणपत्र वेळेत भरण्याचा आणखी एक फायदा म्हणजे भरल्यानंतर काही चूक आढळल्यास ते दुरुस्त (रीवाईज) करता येते. उशिरा भरलेले विवरणपत्र दुरुस्त करता येत नाही. तसेच व्यावसायिक तोटा पुढील वर्षात नेणे (कॅरी फॉरवर्ड) हे विवरणपत्र वेळेत भरले असल्यासच शक्य होते.
4) प्राप्तिकर कायदा कलम 234ए, 234बी तसेच 234सी खालील (आगाऊ कर कमी भरणा केल्याबद्दल; तसेच प्राप्तिकर विवरणपत्र उशिरा भरले तर लागू होणारे) व्याज विवरणपत्र भरण्याच्या आधी जमा करणे आवश्यक आहे.
5) प्राप्तिकर विवरणपत्र भरताना पुढील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे –
अ) पगाराची; तसेच घरापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची तपशीलवार माहिती देणे आवश्यक आहे. मागील वर्षीप्रमाणे फक्त एकूण आकडा देऊन चालणार नाही,
ब) ज्या करदात्यांना कॅपिटल गेन्स या सदराखाली उत्पन्न असेल तर त्यांनी या उत्पन्नामधून केल्या जाणाऱ्या प्रत्येक वजावटीची तपशीलवार व स्वतंत्र माहिती मूळ मालमत्तेच्या हस्तांतराच्या तारखेसह देणे आवश्यक आहे,
क) नवीन फॉर्ममध्ये अनिवासी भारतीयांना एका भारताबाहेरील बॅंक खात्याचा तपशील देता येणार आहे. यामुळे त्यांना प्राप्तिकर परतावा थेट त्यांच्या भारताबाहेरील खात्यात मिळणे सोयीचे होणार आहे,
ख) विवरणपत्र भरण्यापूर्वी आपले वार्षिक करविवरण (26 एएस) तपासून घ्या. यात समाविष्ट असलेले सर्व उत्पन्न आपल्या विवरणपत्रात घोषित केले आहे ना, याची खात्री करा; अन्यथा आपले विवरणपत्र सदोष मानले जाऊन आपल्याला तशी नोटीस येऊ शकते. तसेच या न घोषित केलेल्या उत्पन्नावर जर कर देय असेल तर व्याजही भरावे लागते,
ग) व्यापारी वा व्यावसायिक उत्पन्न असणाऱ्यांनी आपले उत्पन्न अनुमानित उत्पन्नाच्या (प्रिझम्टिव्ह) मर्यादेपेक्षा कमी नाही ना, याची खात्री करून घ्यावी (व्यापारी वर्ग- 8 टक्के वा 6 टक्के- बिगर रोखीच्या व्यवहारांसाठी, व्यावसायिक 50 टक्के) तसे असल्यास आपल्याला टॅक्स ऑडिट करून घेणे आवश्यक आहे,
घ) विवरणपत्र भरताना आपल्या सर्व बचत खात्यांचे व्याज घोषित करायला विसरू नका. हे व्याज रु. 10,000 पर्यंत करमुक्त आहे. (कलम 80 टीटीए). मात्र, त्या पुढील रकमेवर कर भरणे बंधनकारक आहे
, ड) विवरणपत्र भरल्यानंतर आपण ते ई-व्हेरिफाय करू शकता किंवा सही करून बंगळूर येथे पाठवू शकता. यातील ई-व्हेरिफाय हा पर्याय अत्यंत सोपा आणि चांगला आहे. यामध्ये आपण आधार ओटीपीचा, बॅंक खात्याच्या नेट बॅंकिंग, एटीएम कार्ड, काही निवडक बॅंकांच्या खात्याच्या माहितीवरून किंवा डी-मॅट खात्याच्या माहितीवरून (यापैकी कोणताही एक पर्याय निवडून) ई-व्हेरिफाय सुविधेचा वापर करू शकता.
बहुतांश लोकांचे पॅन आणि आधार जोडलेले असल्यामुळे ते सहज शक्य आहे. ई-व्हेरिफाय शक्य नसेल तर मात्र सही करून लवकरात लवकर आपले विवरणपत्र बंगळूर येथे पाठवून द्यावे व त्याची पोचपावती मिळेपर्यंत पाठपुरावा करावा. हे करण्यासाठी आपल्याला 120 दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे. दिलेल्या अवधीत व्हेरिफिकेशन न झाल्यास आपले विवरणपत्र रद्दबातल होऊ शकते.
अधिक वाचा : २०१९ च्या निवडणुकीत १०० टक्के व्ही.व्ही.ए.पी.टी. मशीनचा वापर – निवडणूक आयोग
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola