अकोला दि.24— कापसावर येणाऱ्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या शेतात कामगंध सापळयांचा (फेरोमोन ट्रॅप) वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे.
कामगंध सापळयांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करावा, यासाठी 1 ऑगस्ट हा दिवस फेरोमोन डे म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी या सापळयाबाबत जनजागृती करण्यात येणार असून हे सापळे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
गुलाबी बोंडअळी या पतंगवर्गीय किटकाची मादी एक विशिष्ट प्रकारचा गंध वातावरणामध्ये सोडते. त्यामुळे नर कीटक मादीकडे आकर्षीत होतात. सदर तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतामधील नर पतंग पकडण्यासाठी फेरोमोन सापळे लावून मोठया प्रमाणात नर पतंग पकडण्यात येतात. त्यामुळे पुढील प्रजनन रोखण्यास मदत होते. या किडींच्या संख्येचा अंदाज येण्यासाठी फेरोमोन ट्रॅप अर्थात कामगंध सापळे महत्वाचे साधन आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
फेरोमोन सापळयाचे महत्त्व
फेरोमोन सापळयात सलग तीन दिवस प्रति दिन 8 ते 10 नर आढळून आल्यास किटकनाशकांचा वापर करणे आवश्यक असते. जुलै मध्यानंतर कापसाचे पीक पाते/फुले लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. गुलाबी बोंड अळीचे जीवन चक्र खंडित करण्यासाठी व प्रादुर्भाव तात्काळ लक्षात येण्यासाठी कामगंध सापळयांचा वापर प्रभावी ठरतो. या सापाळयांचा वापर ,कपाशी लागवडीपासून 45दिवसांनी केल्यास किडीची संख्या लक्षात येते व त्यानुसार योग्य किटकनाशकांचा योग्यवेळी व योग्य प्रमाणात वापर करून ही किड नियंत्रणात येऊ शकते. फेरोमोन सापळयांच्या अभावी सुरूवातीच्या अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव लक्षात न येण्याची शक्यता असते त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव उशिरा लक्षात आल्यास किटकनाशके सुध्दा प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळे फेरोमन सापळयाचा वापर करावा.
महाराष्ट राज्य कृषि उदयोग विकास महामंडळ यांचे तालुका स्तरावरील अधिकृत विक्रेते यांचेकडे हे कामगंध सापळे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. या कामगंध सापळयांचा शेतकरी बांधवांनी प्रभावीपणे वापर केल्यास त्यांच्या परिसरामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची बाब लक्षात येणार आहे आणि त्यामुळे गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे सोपे होईल