आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाची शनिवारी महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत सलामीची लढत यजमान इंग्लंडशी होणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ऑलिम्पिक विजेत्या इंग्लंडशी सामना झाल्यानंतर ब-गटात समावेश असलेल्या भारताची दुसरी लढत जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानावर असलेल्या आर्यलडशी २६ जुलैला होणार आहे. त्यानंतर क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या अमेरिकेशी भारताचा २९ जुलैला सामना होणार आहे.
‘‘इंग्लंड संघावर दडपण असेल, आमच्यावर नसेल. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा इंग्लंडला जरूर होईल. परंतु प्रतिस्पध्र्याच्या मैदानावरील प्रेक्षकांच्या साक्षीने खेळणे आमच्यासाठी मुळीच नवे नाही. इंग्लंडविरुद्ध याआधीसुद्धा आम्ही चांगली कामगिरी केली आहे. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गटसाखळीमध्ये आम्ही इंग्लंडला हरवले होते. त्यामुळे या सामन्याकडे आम्ही आत्मविश्वासाने पाहात आहोत,’’ असे भारताची कर्णधार राणीने सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हटले आहे.
२०१०मध्ये अर्जेटिना येथे झालेल्या ‘एफआयएच’ विश्वचषक हॉकी स्पर्धेत याआधी भारतीय संघ सहभागी झाला होता. त्या स्पर्धेत भारताला नववे स्थान मिळाले होते. मात्र राणीने ७ गोल करून स्पर्धेवर छाप पाडली होती. यंदाच्या स्पर्धेतही भारताची धुरा ही राणीवरच अवलंबून आहे. मागील दोन वर्षांत भारतीय संघाने जागतिक क्रमवारीत सर्वोत्तम अशी १०व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. याचे श्रेयसुद्धा राणीलाच जाते.
आठवडाभर आधी लंडनला दाखल झालेल्या भारतीय संघाने ली व्हॅली हॉकी आणि टेनिस स्टेडियमवर सरावाला प्रारंभ केला आहे. याच मैदानावर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियमविरुद्ध एकेक सराव सामनासुद्धा खेळला आहे.
गोल नोंदवण्यासाठी भारतीय संघ विशेषत: आघाडीची फळी फक्त एकटय़ा राणीवर अवलंबून नाही. आमच्याकडे २०० सामन्यांचा अनुभव असलेल्या वंदना कटारियासह आणखी युवा आक्रमक खेळाडू आहेत. जगातील सर्वोत्तम ड्रॅग-फ्लिकर म्हणून ओळखली जाणारी गुर्जित कौर संघात असणे, हे आमच्यासाठी फायदेशीर ठरेल. – शोर्ड मरिन, भारताचे मुख्य प्रशिक्षक
अधिक वाचा : भारताच्या ध्वजातून ‘अशोक चक्र’ गायब!