अकोला – प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामासाठी लागू आाहे. शासनाची ही महत्वाकांक्षी योजना असुन शेतक-यांच्या हितांची योजना आहे. या योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावा तसेच शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शेतक-यांनी त्वरीत पिक विमा काढावा असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात प्रधानमंत्री पिक योजनेच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र निकम, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक ताराणीया, अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत , आयसीआयसीआय लोम्बार्ड चे मॅनेजर रविद्र राजपूत, अकोल्याचे मॅनेजर गौतम पृथ्वी यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी बँक अधिका-यांना सुचना देतांना म्हणाले की, बँकानी सर्व कर्जदार शेतक-यांना पिक विमा काढण्यासाठी मदत सहकार्य करावे. त्यांच्याकडून सातबारा , आठ अ व शेतक-यांनी स्वत: कोणत्या पिकांचा पेरा केला आहे. किंवा कोणते पिक घेणार आहे याचे साध्या कागदावरील डिक्लेरेशन ग्राहय धरावे व त्यांना योजनेचा लाभ दयावा. याकामात कोणीही हलगर्जी पणा करू नये अशा सुचना त्यांनी दिल्यात.
आपले सरकार सेतू केद्रांनी बिगर कर्जदार शेतक-यांचे पिक विमा योजनेचे अर्ज भरतांना चुका न करता शेतक-यांचे जास्तीत जास्त अर्ज भरून घ्यावे. सेतू केद्रांना मिळालेली ही संधी असून या संधीचा त्यांनी फायदा घेवून जास्तीत जास्त शेतक-यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे. अर्ज भरतांना बँकांना किंवा सेतू केंद्रांना अडचणी असल्यास त्यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्सूरन्स कंपनीच्या टोल फ्री क्रमांक 18002669725 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्सूरन्स कंपनीने जनजागृती करून शेतक-यांना प्रधानमंत्री पिक विमा योजना चा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे असे सुचित करून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, इन्सूरन्स कंपनीने तालुका स्तरावर शेतक-यांच्या पिक विमा योजनेचा फॉर्म भरतांना येणा-या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी प्रतिनीधींची नेमणुक करावी. कृषि अधिकारी व तहसिलदार यांनी त्यांच्याशी संपर्क साधुन पिक विमा बाबतच्या असलेल्या समस्या सोडवाव्यात असेही त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री पिक योजनेची अर्ज भरण्याची तारिख 24 जुलै असून शेतक-यांनी 24 तारखेच्या आत पिक विमा काढावा. व होणारा त्रास कमी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. प्रधानमंत्री पिक विमा काढण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य आहे. तरी शेतक-यांनी याची नोंद घ्यावी असेही ते म्हणाले.
यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास पगारे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र निकम, आयसीआयसीआय लोम्बार्ड चे मॅनेजर रविद्र राजपूत व आपले सरकार सेतू केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक प्रविण वानखडे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय कृषि अधिकारी, कृषि विभागाचे अधिकारी, आपले सरकार सेतू केंद्राचे चालक ,कृषि सहाय्यक, तलाठी, व इतर संबंधीत विभागाचे अधिकारी /कर्मचारी उपस्थित होते.
अधिक वाचा : तेल्हारा शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांसह दुकांधारकांवर सुद्धा होणार कारवाई