हिवरखेड-जलशुद्धीकरण केंद्रावरील रोहित्र जळाल्याने गत आठ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज, ४ जुलै रोजी ग्रा. पं. वर धाव घेत ठिय्या आंदोलन केले. एवढेच नव्हे तर ग्रा. पं. ला कुलूप ठोकून आंदोलन केले. ठाणेदारांसह पोलिसांनी धाव घेत जमावाला शांत केले. दरम्यान, नवीन रोहित्र बसवून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.
पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली. ग्रा.पं.ने ठोस भूमिका न घेतल्याने ग्रा.पं.ला ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. येथे वारी येथून चार दिवसांआड पाणी मिळत आहे. जलशुद्धीकरण केंद्रावरील रोहित्र जळाल्यानेे पाणी पुरवठा होत नव्हता. आउटलेटद्वारे पाणी जात असल्याने नागरिकांनी ते वापरणे सुरू केले. पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांनी मोर्चा काढून ग्रा.पं.वर धाव घेतली. तिथे सरपंच, उपसरपंच नसल्याने ग्रामस्थांनी ग्रा.पं.ला कुलूप ठोकले. त्याानंतर ग्रा.पं.समोर आंदोलन केले. सरपंचांनी पोलिसांच्या उपस्थितीत कुलूप तोडले. पाणीपुरवठा सुरू होईल, असे सांगितल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. मोर्चा दरम्यान ठाणेदार देवरे पोहोचले होते.
विरोधात तक्रार दिली ग्रा.पं.मध्ये नागरिकांचा मोर्चा पोहोचल्याची माहिती मिळाल्यावर तेथे गेलो असता आमच्याविरुद्ध तक्रार दिली, अशी प्रतिक्रिया ग्रा.पं. सदस्य सुरेश आेंकारे यांनी दिली.
हा प्रकार योग्य नाही
वीज रोहित्र जळाल्यानेे व दुसरे वीज रोहित्र उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. परंतु, २४ तासांत गावातील पाणीपुरवठा सुरळीत होईल. मात्र आज ग्रामपंचायतीमध्ये घडलेला प्रकार योग्य नाही.
– बी. एस. गरकल, ग्रामविकास अधिकारी
निंदनीय घटना
कर्मचाऱ्यांना कार्यालयात डांबले. ही घटना वाईट आहे. गावात कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत. हे विरोधी सदस्यांना पाहवत नाही म्हणून काही लोकांना सोबत घेऊन असे विरोधी कृत्य करत आहेत.
– शिल्पाताई भोपळे, सरपंच, हिवरखेड