अकोला : महावितरण चा कारभार लोकाभिमूख आणि पारदर्शी व्हावा यासाठी महावितरणच्या सोयी सुविधांची माहिती वीजग्राहकांना आॅनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून संभाव्य ग्राहकांना लागणाऱ्या सर्व वर्गवारीतील मीटर्सबाबतची उपलब्धता महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
कोणत्याही ग्राहकाला नवीन विद्युतपुरवठा हवा असल्यास त्यासाठी लागणाऱ्या मीटर्सबाबतची सद्यस्थिती ते घरबसल्या महावितरणच्या संकेतस्थळावर बघू शकणार आहेत. मीटर्सच्या उपलब्ध्तेबाबत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्याने महावितरणने ग्राहकाभिमूख सोयीकरिता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
महावितरणने सर्व वर्गवारीतील संभाव्य वीजग्राहकांना मीटर्सची उपलब्धता आता महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. यात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांच्या वर्गवारीतील ग्राहकांना लागणाऱ्या मीटर्सच्या उपलब्धतेबाबत उपविभागीय कार्यालयापर्यन्त समावेश करण्यात आला आहे.
टाळाटाळीला बसणार चाप
महावितरणच्या संकेतस्थळावर शाखा कार्यालयांपर्यन्त मीटर्सबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे येथून पुढे आता ग्राहकांना मीटर्स नाहीत या सबबीखाली त्यांची गैरसोय होणार नाही. मीटरच्या पुरवठ्याबाबत व सद्यस्थितीबाबत ते स्वत: महावितरणच्या संकेतस्थळाला भेट देऊन मीटर्सच्या उपलब्धतेबाबत खातरजमा करू शकणार आहेत. त्यामुळे मीटर्सच्या उपलब्धतेबाबत आता कोण्त्याही संबंधित अधिकाऱ्याला टाळाटाळ करता येणार नाही.
टोल फ्री क्रमांक उपलब्ध
महावितरणच्या टोल फ्री क्र. १८०० १०२ ३४२५ व १८०० २३३ ३४३५ यावर संभाव्य वीजग्राहक नवीन वीजपुरवठा, त्वरित जोडणीकरिता किंवा नादुरुस्त मीटर बदलणेकरिता संपर्क साधू शकतात.
अधिक वाचा : एका सेकंदात मिळवा विनामूल्य पॅन कार्ड – आयकर विभागाची योजना