१४ पिकांच्या हमीभावात वाढ : मोदी सरकारचा शेतकऱ्यांना सुखद धक्का
२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. केंद्र सरकारने खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात दीडपटीनं वाढ केली असून धानाच्या हमीभावात क्विंटलमागे तब्बल २०० रुपयांची वाढ केली आहे. या निर्णयामुळं कर्जबाजारीपणा, नापिकी आणि दुष्काळानं होरपळलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. धानाच्या किमान आधारभूत किंमतीत २०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हा दर आता १८०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. खरीप पिकांच्या हमीभावात दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच इतकी मोठी वाढ करण्यात आली आहे. या आधी २००८-०९मध्ये यूपीए सरकारनं १५५ रुपयांची वाढ केली होती.
त्याशिवाय १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली आहे. या पिकांचा हमीभाव ९०० रुपयांवरून थेट २,७०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. त्यामुळं सरकारच्या तिजोरीवर ३३,५०० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. विशेष म्हणजे, वाढीव हमीभावाचे मूल्य जीडीपीच्या ०.२ टक्के आहे. तर, अतिरिक्त खर्चात धानासाठी १२,३०० कोटी रुपये खर्च होणार आहे.
या पिकांच्या हमीभावात वाढ (क्विंटलमागील दर)–
कापूस- 4320 रुपये (आधी), 5450 रुपये (आता)
भुईमूग- 4450 रुपये (आधी), 4890 रुपये (आता)
सोयाबीन- 3050 रुपये (आधी), 3399 रुपये (आता)
ज्वारी (हायब्रीड)- 1700 रुपये (आधी), 2430 रुपये (आता)
बाजरी- 1425 रुपये (आधी), 1950 रुपये (आता)
भात- 1550 रुपये (आधी), 1750 रुपये (आता)
तूर- 5450 रुपये (आधी), 5675 रुपये (आता)
मूग- 5575 रुपये (आधी), 6975 रुपये (आता)
उडीद- 5400 रुपये (आधी), 5600 रुपये (आता)
मका- 1425 रुपये (आधी), 1700 रुपये (आता)
सूर्यफूल- 4100 रुपये (आधी), 5388 रुपये (आता)
अधिक वाचा : महाराष्ट्र कृषी दिन : महाराष्ट्र सरकारचे शेतीविषयक धोरण आणि शेतीसाठीच्या योजना