अकोला, दि. 1 :- पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने सामाजिक दायित्व म्हणून एक वृक्ष लावुन त्याचे संगोपन करुन ते जगवणे अत्यंत गरजेचे आहे. असे सांगुन वृक्षलागवडीच्या महत्वाकांक्षी संकल्पामध्ये मी सहभागी झालो आहे, आपणही वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नागरीकांना केले.
या संकल्पामध्ये भाग घेणाऱ्या नागरीक , शासकीय विभाग,सामाजिक संस्था आणि इतर सर्व घटकांचे आभार पालकमंत्र्यांनी मानले. वृक्ष लागवडीचा संकल्प यशस्वी करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत आज मोर्णा नदी काठी पालकमंत्री रणजीत पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, उपवनसंरक्षक एस.बी. वळवी, सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी विजय माने, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, आदींसह मोठया संख्येने विविध महाविदयालयांचे विदयार्थी आणि नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी यावेळी वृक्ष लागवड केली.
महाराष्ट्र शासनाद्वारे लोकसहभागातून 1 जुलै ते 31 जुलै 2018 दरम्यान 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. असा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्या संकल्पपुर्तीसाठी माझे एक झाड, मोर्णा काठी या उपक्रमातंर्गत सामाजिक वनीकरण विभाग तसेच वनविभागातर्फे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन आज सकाळी मोर्णा नदी काठी करण्यात आले होते.
जनतेमध्ये जनजागृती करुन जनतेला वृक्षलागवडीबाबत प्रोत्साहीत करण्यासाठी पालकमंत्री रणजीत पाटील यांनी मोर्णा काठी वृक्षारोपण केले. त्यांच्या माध्यमातुन वृक्षलागवडीबाबत नागरीकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेला जिल्हयात उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे. माझे एक झाड, मोर्णा काठी या संकल्पाच्या माध्यमातून आज मोर्णा काठी वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. या नदीच्या काठावर सुमारे 3 हजार वृक्ष लागवडीचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकांनी आपले एक झाड येथे लावून त्याचे संगोपन करावे.
अकोला जिल्हयासाठी तब्बल 19 लाख 22 हजार वृक्ष लागवडीच उदिष्ट देण्यात आले आहे. आजपासून वृक्ष लागवडीची मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शासकीय यंत्रणेसह सामान्य नागरिक, विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्या आहेत. शासकीय यंत्रणा दिलेल्या उदिष्टाप्रमाणे वृक्ष लागवड करणार आहेत.
वन विभागातर्फे स्थापन करण्यात आलेल्या विविध रोपे विक्री केंद्रांवरुन नागरिकांनी रोपे घेऊन जाता येतील. अकोला येथे रोप विक्री केंद्र हे वनकुटी, अशोक वाटीकेसमोर, अकोट येथे वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) कार्यालय व तहसिल कार्यालय येथे रोप विक्री केंद्र आहे. तसेच जिल्हयात वन विभागाकडून 19 व सामाजिक वनीकरण विभागाकडून 21 रोपवाटिका तयार करण्यात आलेल्या आहेत. या रोप वाटिकेत 20 लक्ष 10 हजार रोपे आहेत, नागरीकांनी मोठया प्रमाणात रोपे घेवुन वृक्षारोपणाचे संकल्पात सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात येत आहे.
खैर, पांगरा, अंजन, निम, काशिद, शिरस, करंज, विलायती चिंच, आवळा, चिंच, सिताफळ, शेवगा, जांभूळ, हादगा, वड, पिंपळ, बांबू, पिशवीतील साग रोपे, गुलमोहर, अमलतास, रेन ट्री, पेल्ट्रोफोरम, कांचन, बोगनवेल, क्रोटॉन, डयुरांटा, मोगरा, वड इत्यादी रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामुळे जिल्हयात वृक्षलागवडी बाबत समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक वाचा : अकोट पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेळके यांचे अकोट शहरवासीयांना आवाहन