कौशल्याधारीत शेती व पूरकव्यवसायाच्या शाश्वत साथीने यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करूया – कुलगुरू डॉ व्ही एम भाले
अकोला(प्रतिनिधी)-येणारा खरीप हंगाम सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग, तत्सम सर्व शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी आणि खाजगी संस्थांनी सामुहिक प्रयत्नाने विदर्भातील प्रत्येक गावापर्यंत प्रगत कृषी तंत्रज्ञान वेळेत पोहोचवत शेतकरी वर्गाला आर्थिक, सामाजिक आणि मानसिक स्थैर्यप्राप्तीसाठी कंबर कसली असून या अभियानात शेतकरी बंधूनी सुद्धा सकारात्मक साथ देत कौशल्याधारीत तांत्रिक शेती व जोडीला उपलब्ध संसाधनांवर आधारित जोडधंद्याची कास धरावी असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही एम भाले यांनी केले.हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या १०५ व्या जयंती निमित्त विद्यापीठाच्या समिती सभागृहात आयोजित “कृषीदिन”कार्यक्रमाचे प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. गत वर्षी गुलाबी बोंड अळीच्या अति प्रादुर्भावाने झालेले प्रचंड नुकसान आणि कीडनाशक फवारणी दरम्यान विषबाधेने झालेली जीवित हानी यंदा कदापीही होणार नाही याकरीता डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने अगदी सुरुवातीपासूनच जाणीव जागृती अभियान राबवीले असून कपाशी, धान आणि सोयाबीन हि महत्वाची पिके लक्षात घेता त्यांचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आतापासूनच कार्यान्वित करण्याचे दृष्टीने कृषी महाविद्यालये व तंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येत असल्याचे डॉ. भाले यांनी आपल्या मनोगतात सांगितले व शासन पुरस्कृत शेतकरी बंधूनी कृषी दूत म्हणून शेतकरी व तंत्रज्ञ यांचे मध्ये दुवा म्हणून कार्य करावे अशी अपेक्षा सुद्धा डॉ भाले यांनी व्यक्त केली.
कृषीदिनाचे औचित्य साधत कृषि विद्यापीठाने आज महाराष्ट्र शासन पुरस्कृत विदर्भातील १५ प्रयोगशील शेतकरी बंधू भगिनींचा शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यामध्ये वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कारप्राप्त श्री. शेषराव निखाडे (सेलोटी ता. लाखांनी जि.भंडारा), श्री.दत्तात्रय गुंडावार (चिंचाळा, ता. भद्रावती. जि. चंद्रपूर), जिजामाता कृषीभूषण पुरस्कृत सौ. लक्ष्मीबाई पारवेकर (सवना. ता. महागाव, जि. यवतमाळ), वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कारप्राप्त कु. चैताली नानोटे (निभारा. ता. बार्शीटाकळी. जि. अकोला), श्री. रवींद्र मेटकर (म्हसला, ता.जि. अमरावती), श्री. सचिन सारडा (शिरपूर जैन. ता. मालेगाव. जि.वाशीम), श्री. शालिग्राम चाफले (रेहकी. ता. सेलू. जि. वर्धा), श्री. रियाज शेख सरदार कन्नोजे (बेसूर. ता. भिवापूर जि. नागपूर), श्री. अविनाश कहाते (रोहणा. ता. आर्वी. जि. यवतमाळ), श्री. झापू जामूनकर (रेह्याटखेडा ता. चिखलदरा जि. अमरावती), श्री. वडू लेकामी (मरपल्ली ता.एटापल्ली. जि. गडचीरोली), उद्यान पंडित सौ.पुष्पा खुबाळकर (खुबाळा. ता. सावनेर. जि. नागपूर), श्री. हिम्मतराव टप्पे (कोठारी खुर्द, .ता. पातुर. जि. अकोला), कृषीभूषण (सेंद्रिय शेती) कु. नासरी चव्हाण (बोराळा. ता. तेल्हारा. जि. अकोला), श्री. सुधाकर कुबडे (सेलू. ता. कळम्बेश्वर. जि. नागपूर) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर,यांनी केले तर पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रतिनिधी श्री. शेषराव निखाडे, श्री. झापू जामूनकर, कु. नासरी चव्हाण, सौ. लक्ष्मीबाई पारवेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विचारमंचावर संधोधन संचालक डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. डी.एम.पंचभाई, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुधीर वडतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर सभागृहात मोठ्या संख्येने शेतकरी बंधू भगिनी सह विद्यापीठातील शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यानी तर आभार प्रदर्शन मुख्य संपादक श्री, संजीवकुमार सलामे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी विस्तार शिक्षण संचालनालयातील डॉ. एन एम काळे, डॉ पी पी चव्हाण, डॉ पी के वाकळे, डॉ. के टी लहरीया, डॉ. सुहास मोरे, श्री. प्रशांत पौळकर, श्री. मकरंद शिंदे, यांनी परिश्रम घेतले.