अकोला, दि. 30 – एक दिवस शेतकऱ्यांसोबत या उपक्रमातंर्गत पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज अकोला तालुक्यातील डोंगरगाव, मासा-सिसा (उदे) येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांची भेटी घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची आस्थेने चौकशी करुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडवण्यात येतील, असा दिलासाही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत जेवनही केले. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढील महिन्यांत एक मोठे शिबीर आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसिलदार विजय लोखंडे, कृषी अधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून आज जिल्हाभरात एक दिवस शेतकऱ्यांसोबत हा उपक्रम राबविण्यात आला. प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही मोहिम राबविण्यात आली. विविध विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुमारे 10 हजार शेतकऱ्यांशी आज संवाद साधण्यात आला. या उपक्रमात लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.
स्वत: पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज सकाळी प्रारंभी डोंगरगावला भेटी दिली. येथील मधुकर महादेव देवकर यांच्या शेतात जाऊन त्यांनी शेताची पाहणी केली. पेरणीसाठी कोणते बियाणे वापरले, कुठून खरेदी केली, याबाबत आस्थेने चौकशी केल्यानंतर त्यांची व परिसरातील उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर शेतकऱ्यांसोबत जेवन केले.
याच परिसरातील श्रीकृष्ण नामदेव देवर यांच्या शेतात ते गेले. दहा गुंठेत लागवड केलेल्या पालकाची त्यांनी पाहणी केली. तेथे काम करीत असलेल्या शेतमजुरांची चौकशी केली. दिव्यांग असलेले शेतमजूर नंदू भटकर व त्यांच्या पत्नीची सहानुभूतीपूर्वक चौकशी केली. दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगून त्यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याच परिसरातील शेतातील वाकडे झालेले वीजेचे खांब दोन दिवसांत सरळ करण्याबाबत पालकमंत्री यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना केली.
डोंगरगावातीलच प्रगतीशील शेतकरी शिरीष देशमुख यांच्या शेडनेटला त्यांनी भेट दिली. या ठिकाणी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वृक्षरोपण केले. स्वातंत्रयसैनिक रमाबाई शंकरराव देशमुख यांची त्यांनी भेट घेऊन चौकशी केली.
यानंतर मासा-सिसा (उदे) येथील तरुण शेतकरी प्रफुल्ल भास्कर फाले याने तयार केलेल्या भुईमुग फोडणी यंत्राची पाहणी करुन त्याचे कौतुक केले. यानंतर पालकमंत्री यांनी गावातील शेतकऱ्यांसोबत एकत्र बसून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. गावातील शाळा, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, याबाबतची स्थिती जाणून घेतली. भरघोस उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी शेततळे घ्यावेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षलागवड करावी. शौचालय बांधून त्याचा वापर करावा. पिकांवर फवारणी करताना काळजी घ्यावी, असा सल्ला पालकमंत्री यांनी शेतकऱ्यांना दिला.
जिल्हाधिकारी म्हणाले की, प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतक-यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक दिवस शेतक-यांसोबत हा उपक्रम आज जिल्हाभरात राबविण्यात आला. शेतकऱ्यांना काय अडचणी आहेत, याची माहिती या उपक्रमासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मिळाल्यानंतर त्याचे निराकरण करण्यात येणार आहेत. या संवाद दरम्यान शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली.