जुलै महिन्यातही पाऊस सरासरी गाठेल
मान्सूनने बुधवारी महाराष्ट्र व्यापल्यानंतर गुरुवारी तो देशाच्या राजधानीत दाखल झाला. २६ जूनपर्यंत रेंगाळत प्रवास करणाऱ्या मान्सूनने दोन दिवसांमध्ये मोठी मजल गाठली. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सूनच्या गुजरात, राजस्थान आणि देशातील उर्वरित भागांमध्ये प्रवास करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे ७२ तासांमध्ये मान्सून संपूर्ण देश व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
जूनमध्ये पावसाने अधूनमधून मुसळधार कोसळत मुंबईमध्ये सरासरी ओलांडली. जुलै महिन्यातही पाऊस सरासरी गाठेल, असे पूर्वानुमान हवामान विभागाने वर्तवले आहे.
जूनमध्ये देशात सरासरीपेक्षा १० टक्के कमी पावसाची नोंद झाली. वायव्य भारत, मध्य भारत, पूर्व भारत आणि ईशान्य भारत येथेही सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवण्यात आला. पूर्व आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाला. मात्र दक्षिण द्विपकल्पामध्ये १७ टक्के अधिक पाऊस पडला. गुरुवारी हवामान विभागातर्फे जुलैचे पावसाचे पूर्वानुमान देण्यात आले. यानुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यात मध्य आणि पूर्व भारत वगळता पाऊसमान सरासरीइतके असेल. या कालावधीत मध्य आणि पूर्व भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस कोसळेल. दुसऱ्या आठवड्यात देशातील बहुतांश भागामध्ये मान्सूनची सक्रियता वाढेल आणि देशातील बहुतांश भागामध्ये सरासरीहून जास्त पावसाचा अंदाज आहे.
२१ जून ते २७ जून या काळात गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीहून अतिरिक्त पावसाची नोंद झाली, तर मराठवाड्यातही सरासरीहून जास्त पाऊस पडला. संपूर्ण जूनचा विचार केल्यास कोकण आणि गोव्यामध्ये तसेच मराठवाड्यात सरासरीहून अधिक पाऊस पडला, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीइतक्या पावसाची नोंद झाली. मुंबईनेही पावसाची जूनमधील सरासरी चांगल्याच फरकाने ओलांडली. आज, शुक्रवार २९ जून ते ४ जुलैपर्यंत कोकण आणि गोव्यामध्ये सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातही शुक्रवारी सर्वदूर पाऊस असेल मात्र त्यानंतर ४ जुलैपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भातही शुक्रवारी बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
अधिक वाचा : प्लास्टिक बंदीला स्थगिती देण्याची भाजपची मागणी