* 5 ते 6 एकर क्षेत्रांचे भव्य शेततळे
* पहिल्याच पावसात जलसंचय झाल्याने शेतकरी समाधानी
* भव्य शेततळयांमध्ये होणार पाण्याचा मोठया प्रमाणात संचय
* खासदार व जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
अकोला(प्रतिनिधी)- अकोल्याहून अकोटकडे जाताना लागणाऱ्या अनेक गावांमध्ये जिकडे नजर जाईल तिकडे अवाढव्य शेततळे नजरेस पडतात. मोठया तलावासारख्या दिसणाऱ्या या शेततळयांमध्ये नुकत्याच पडलेल्या पावसामुळे पाणी जल संचय झाल्याने त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. चार, पाच व सहा एकर क्षेत्रातील ही भव्य शेततळे इतर जिल्हयांसाठी आदर्श ठरली आहेत.
नुकतेच खासदार संजय धोत्रे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या शेततळयांची पाहणी केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे बांधकाम, अकोट-अकोला रोडचे रुंदीकरण, अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण यासाठी गौण खनिजांची गरज भागविण्यासाठी या कामांशी जलसंधारणाच्या कामांची सांगड घालून ही अवाढव्य शेततळयांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दौड यांनी ही सर्व शेततळे साकारण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
अकोट तालुक्यातील कालवाडी येथील 6 एकरचे शेततळे, वणी वारुळा येथील 2.5 एकर क्षेत्रातील शेततळे, बळेगाव येथील 2.5 एकर व 2 एकर क्षेत्रातील शेततळे, तरोडा येथील 4 एकर क्षेत्रातील शेततळे, करोडी येथील 4 एकर क्षेत्रातील शेततळे, दनोरी येथील 4 एकर क्षेत्रातील शेततळे, देवरी येथील 3 एकर क्षेत्रातील शेततळयांची मान्यवरांनी पाहणी केली. गायरान जमीन, नदीचे पात्र आणि शेतकऱ्यांच्या शेतात या शेततळयांची निर्मिती करण्यात आली आहे. यातील गौण खनिज रेल्वे मार्गासाठी वापरण्यात आले आहे. 50-50 फुट खोल करण्यात आलेल्या या शेततळयांमध्ये पावसाचे 15 ते 20 फुटपर्यंत पाणी जमा झाले आहे. काही ठिकाणी झरे लागल्याने हा जलसंचय वाढत आहे.
शेततळयांमध्ये मोठया प्रमाणात पाणी साचल्याने या भागातील पाण्याचा प्रश्न मिटला असून याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. भविष्यात अपघात टाळण्यासाठी या शेततळयांना कुंपन घालण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. पोहण्यासाठी हे क्षेत्र निषिध्द असल्याचे फलकही लावण्याबाबतही त्यांनी सूचना केली. शेततळयांच्या भिंतीवरील माती बरेचदा खचते, त्यामुळे त्या ठिकाणी खस गवत लावण्यात येणार आहे. याशिवाय कडुलिंब, कडू बदाम या सारख्या वनस्पतींच्या बिया मातीच्या गोळयात टाकून ते गोळे भिंतीवर फेकावे, अशी सूचना करताना त्या ठिकाणी झाडे उभी राहतील परिणामी शेततळयांची माती ढासळणार नाही, असे त्यांनी सांगितले.
अकोला जिल्हयामध्ये प्रथमच इतक्या मोठया प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली आहेत. यामुळे नियोजनबध्द पध्दतीने जलसंचय होईल व त्यामुळे परिसरातील शेती सिंचनाकरीता, पशु-पक्ष्यांकरीता पाणी उपलब्ध होईल. तसेच भूजल पातळीमध्ये निश्चितच वाढ दिसून येईल, यात काही शंका नाही.