अकोला, दि. 23 — भरघोस उत्पादन देणाऱ्या फळबाग व वृक्षलागवड कार्यक्रमाचा लाभ घेण्याचा निर्धार बार्शिटाकळी आणि अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. शासनाच्या या दोन्ही योजनेतंर्गत शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असून त्याच बरोबरीने भविष्यात फळबाग व वृक्षांपासून उत्पन्न् मिळणार असल्याने या योजनांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सदर योजना प्रभावीपणे राबविण्याकरीता प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहिल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण विभागामार्फत 100 टक्के अनुदानावर वृक्षलागवड योजना आणि कृषी विभागामार्फत अनुदानावर फळबाग लागवड योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा याकरीता नुकतेच बार्शिटाकळी तालक्यातील धाबा येथे व अकोट येथील कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या सभागृहात फळबाग लागवड व वृक्ष लागवड कार्यशाळा घेण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.
धाबा येथील कार्यक्रम प्रसंगी आमदार हरिष पिंपळे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, तहसिलदार रवी काळे, जिल्हाधिकारी यांचे बंधू दिनेश दुबे, अशितोष पाण्डेय, प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी अरुण वाघमारे, गटविकास अधिकारी संदीप भंडारी, तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे, आदींसह नगरसेवक आणि मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते. तर अकोट येथील कार्यक्रमप्रसंगी खासदार संजय धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, जि.प. सदस्य बाळासाहेब बोंदरे, उपविभागीय उदय राजपूत, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर, तहसिलदार विश्वनाथ घुगे आदी उपस्थित होते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड केली जाणार असून या रोपांची देखभाल संगोपन केल्याबद्दल शेतकऱ्यांना आर्थिक मोबदलाही दिला जाणार आहे. वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचे संवर्धन साधताना ग्रामीण भागातील अल्पभूधारक, शेतकऱ्यांना, शेतमजूरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने ही योजना नुकतीच 12 एप्रिल रोजी शासन निर्णय जारी करुन लागू केली आहे. तसेच फळबाग लागवडीसाठीही शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला दिला जाणार आहे. या योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
विशेष म्हणजे एकाच दिवसांत बार्शिटाकळी तालुक्यातील 610 शेतकऱ्यांनी तर अकोट तालुक्यातील 1210 शेतकऱ्यांनी सदर योजनेत सहभागी होण्यासाठी फॉर्म भरुन दिले. दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचा निर्धार व्यक्त करताना ही योजना यशस्वीपणे राबविण्याचा संकल्प बोलून दाखविला. दोन्ही तालुक्यातील सरपंचांनी आपआपल्या गावांतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फळबाग व वृक्षलागवड कार्यक्रमाचा लाभ मिळण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
बार्शिटाकळी तालुक्यात पाणी फाउंडेशन अंतर्गत तर अकोट तालुक्यात शेततळयांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली आहेत. पहिल्या पावसातच या कामांमध्ये पाणी जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, त्यामुळे आता पारंपारिक पिके न घेता फळबाग व वृक्ष लागवड करुन भरघोस उत्पादन मिळवण्याबरोबरच पर्यावरणाचे रक्षण करण्याचा कानमंत्र जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिला. सोबत कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय यासारखे जोडधंदे करण्याचा सल्ला दिला. पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडांची संख्या वाढविण्याकरीता आगपेटी मुक्त शिवार उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
पिक कर्जापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवू नये यासाठी बँकांना ताकीद देण्यात आली असून पिक कर्ज न मिळाल्यास थेट आपल्याकडे तक्रार करावी तसेच पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बचत खात्यातच जमा करण्याचे निर्देशही बँकांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार संजय धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे , आमदार हरिष पिंपळे यांनीही आपल्या भाषाणातून फळबाग व वृक्षलागवड योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. धाबा येथील कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात पारधी समाजातील लोकांना जातीचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले.
***